रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर २ वर्षांनी हापूसच्या अमेरिकावारीला मुहूर्त मिळाला आहे. अमेरिकेच्या पथकाने वाशी येथील विकिरण केंद्राची ६ एप्रिलला, तर त्यानंतर लासलगाव येथील केंद्राची पाहणी केली. या पाहणीनंतर निर्यातीला हिरवा कंदील दिला.
त्यानंतर आतापर्यंत दोन्ही ठिकाणांहून सुमारे १५ टन आंबा अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आला आहे. त्यात हापूसचा टक्का अधिक आहे. मात्र स्थानिक बाजारात दर चढे असल्याने व हवाई वाहतुकीचा खर्च तिप्पट झाल्याने निर्यातीकडे कल कमी आहे.
भारतातील आंब्याला विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तथापि, निर्यातीपूर्वी विविध प्रक्रिया पूर्ण करने बंधनकारक आहे. अमेरिकाला आंबा पाठवताना विकिरण प्रक्रिया अनिवार्य असते. त्यासाठीच वाशी व लासलगाव येथील केंद्रांची पाहणी करण्यात येते. या पाहणीच्या आधारे त्या आंब्याला प्रमाणपत्र देण्यात येते.