मुंबई (प्रतिनिधी) : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सनराझयर्स हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या राहुल त्रिपाठीने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मागे टाकले आहे. राहुलची त्या सामन्यातील सर्वाधिक ७१ धावांची खेळी विक्रमी ठरली. राहुलचे आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक आहे. त्याने हार्दिकला मागे टाकत नवा पराक्रम केला. पंड्याच्या नावे अर्धा डझन हाफ सेंच्युरी आहेत. कोलकाता नाइट रायडर्सचा नितीश राणा आणि आंद्रे रसल यांनी तुफान फटकेबाजी करत संघाला १७५ धावांपर्यंत मजल मारून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करत असताना राहुल त्रिपाठी आणि आयडन मर्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने कोलकातावर मोठा विजय मिळवला. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा (३) आणि केन विल्यमसन (१७) पॉवरप्ले मध्येच बाद झाले. पण तिसऱ्या विकेटसाठी राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम जोडीने ९४ धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ७१ धावा कुटल्या. त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दरम्यान, त्याआधी प्रथम फलंदाजी करताना आरोन फिंच ७ धावांवर बाद झाला. व्यंकटेश अय्यर (६) आणि सुनील नरिन (६) एकाच षटकात माघारी परतले. श्रेयस अय्यरही २८ धावांवर तंबूत परतला. नितीश राणाने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या, तर आंद्रे रसलने ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत नाबाद ४९ धावा कुटल्या.