Wednesday, July 24, 2024
Homeकोकणरायगडपालीत वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल

पालीत वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल

गौसखान पठाण

सुधागड-पाली : उन्हाळी सुट्टी लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येने भाविक व त्यांच्या त्यांची वाहने पालीत दाखल होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी गैरसोय होत आहे.

पालीच्या बाह्यवळण मार्गाला मंजुरी असूनही हा मार्ग लालफितीत अडकला आहे. यासंदर्भात अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला आहे. खासगी अवजड वाहनांची ये-जा, नियमाचे उल्लंघन करणारे चालक, अरुंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते.

सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पाली वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. येथील बल्लाळेश्वर मंदिर, मारुती मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागतात. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही नाक्यांवर वाहतूक पोलीस तैनात असूनही अरुंद रस्ते व अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरून दुहेरी वाहतूक आणि वाहनांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा केलेली वाहने यामुळे पोलिसांना या वाहतूक नियंत्रण मिळवणे कठीण होते.

बल्लाळेश्वर मंदिर परिसरात देवस्थानचे सुरक्षारक्षकसुद्धा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तैनात आहेत. संध्याकाळनंतर मात्र बऱ्याचदा वाहतूक वाहतूक पोलीस नसतात. यावेळी बऱ्याचदा वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी बाह्यवळण काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बलाप गावावरून थेट बल्लाळेश्वर मंदिराजवळ मार्ग काढण्याचा पर्याय आहे. त्यासाठी शासनाची मंजुरीही मिळाली आहे; परंतु पर्यायी मार्ग लालफितीत अडकला आहे.

वाहनचालकाने नियमांचे पालन केले पाहिजे. अवैध पार्किंग करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे. मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे. पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे.

– प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -