वाडा (वार्ताहर) : वाड्यातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेकडे वळले आहेत. आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. सांगे येथील युवा शेतकरी गौतम पाटील यांनी तर आज चक्क ड्रोनद्वारे खरबुजावर औषधे फवारणी करत हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ सांगेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीविषयक अधिक माहिती मिळावी व शेतीतील श्रम कमी करण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मोलाच्या उपाय योजना करण्यात याव्यात, यासाठी सदर प्रात्यक्षिक सांगे येथे गौतम पाटील या तरुण शेतकऱ्यांचे शेतावर खरबूज या पिकावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक आज सादर केले.
वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ सांगेचे गौतम पाटील हे सदस्य असून मंडळाच्या माध्यामातून शेतीविषयक असे उपक्रम राबवले जातात. त्यातील एक हा प्रयोग आहे. कारण कलिंगड, खरबूज केल्यावर पिक चांगले पसरते व औषध फवारणी करण्यासाठी शेतात पाय ठेवता येत नाही. त्यामुळे वेळेवर फवारणी करणे शक्य होत नाही. अशा वेळेस सदर प्रकारची फवारणी करणे गरजेचे व फायदेशीर ठरते.
गौतम पाटील गेली ५ वर्षे सातत्याने खरबूज लागवड करत आहेत. पालघर जिल्ह्यात कलिंगड हे पिक पारंपरिक पद्धतीने रब्बी हंगामामध्ये घेतले जाते. वाडा तालुका कलिंगड लागवडीचे प्रमुख ठिकाण आहे. मात्र खरबूज लागवड कशी करावी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ५ वर्षांपूर्वी केला, असे गौतम पाटील म्हणाले. सदर पिक बघून गेल्या २ वर्षांपासून वाडा तालुक्यात खरबूज हे कलिंगड पिकाला पर्यायी पिक म्हणून शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी कलिंगड हे एकच पिक घेतल्याने कधी कधी भाव मिळत नाही. त्यामुळे हा पर्याय चांगला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ सांगे यांनी या पूर्वी भातशेतीमधील यांत्रिकीकरण असे प्रयोग यशस्वी राबवले असल्याने परिसरातील व वाडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन ड्रोनद्वारे फवारणीची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी अनिल पाटील यांचे गौतम यांना मार्गदर्शन लाभले.
पारंपरिकपेक्षा फायदेशीर
साधारणपणे एक एकर क्षेत्रावर साधे पंपाने औषध मारण्यास २०० लिटर पाण्याची गरज असते. मात्र ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी फक्त दहा लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे औषधाचा कण हा खूप सूक्ष्म होऊन, फवारणी चांगली होते व आर्थिक बचत होते. फवारणी सर्व ठिकाणी समान होते. शिवाय, फवारणी करताना औषधाचा संपर्क कमीत कमी आल्याने आरोग्याला हानिकारक होत नाही.