नेरळ (वार्ताहर) : बैलगाडी शर्यतीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. मात्र रायगड जिल्ह्यात शासनाची परवानगी न घेता आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये दोन अपघात झाले आणि रायगड जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतींवर बंधने येऊ लागली. प्रशासनाचे लक्ष जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतींकडे लागून असल्याने चोरून होणाऱ्या बैलगाडा शर्यतीही आयोजित करण्याची हिम्मत बैलगाडाप्रेमी करीत नव्हते. पण शासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बैलगाडी शर्यतीसाठी अधिकृत परवानगी घेऊन अशा शर्यती आयोजित केल्यास प्रशासन परवानगी देऊ शकते. हा मेसेज आता रायगड जिल्ह्यात सर्वत्र फिरू लागल्याने गुढीपाडव्याला ठाणे जिल्ह्यात शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन बैलगाडा शर्यत आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
त्यातून कर्जत तालुक्यात बैलगाडा शर्यती पहिल्यांदा शासनाची परवानगी घेऊन आयोजित झाल्या आणि दिवसभर शासनाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या देखरेखीखाली शर्यती आयोजित झाल्याने आता जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. दरम्यान, बैलगाडी शर्यतीत राज्यात सर्वाधिक उत्साह दाखवणारा जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात आगामी दोन महिने रणरणत्या उन्हात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार, हे जवळपास नक्की आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तसेच जिल्ह्याकरिता कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भावाच्या आनुषंगाने आदेशामध्ये नमूद केलेल्या मागदर्शक सूचनांनुसार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल, उपविभागीय दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग यांनी सादर केलेल्या अहवालानुसार बैलगाडी शर्यत आयोजित करणेबाबत खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यात येऊ शकते. बैलगाडा शर्यतीसाठी घालण्यात आलेल्या अटींमध्ये गाडीवान म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभाग घेऊ इच्छिणारा कोणताही गाडीवान किंवा सहभागी यांच्या ओळखीबाबतचा पुरावा आणि बैल व वळू यांचे छायाचित्र यांसह शर्यतीचे ४८ तास आधी आयोजकांकडे शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडील दि. १०/११/२०१७ रोजीच्या अधिसूचनेतील अनुसूची-क मध्ये विहीत केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करेल.
वरील शर्यतीत सहभाग घेणाऱ्या सर्व व्यक्तींनी नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यावसायिकांकडून बैलाची/वळूंची तपासणी करून व ते निरोगी असल्याचे प्रमाणित करून घ्यावे व शर्यतीच्या अगोदर शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडील दि. १०/११/२०१७ रोजीच्या अधिसूचनेतील अनुसूची-ब मध्ये विहीत केलेल्या नमुन्यामध्ये नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र सादर करावे. स्वास्थ (फिटनेस) प्रमाणपत्राची वैधता शर्यतीचे दिवस धरून ४८ तास इतकी असेल.
आयोजकांनी शर्यतीदरम्यान नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यावसायिकाची सेवा किंवा पशु रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून ठेवणे आवश्यक राहणार आहे.