
माटुंगा अपघातामुळे रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान
मुंबई (प्रतिनिधी) : माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वे रूळ, बाजूला असलेले खांब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या असल्याने लोकलचे वेळापत्रक तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक हे पूर्णपणे कोलमडले. या अपघातातील डबे बाजूला काढून ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेणे, रेल्वे ट्रॅक दुरुस्त करणे, ओव्हरहेड वायर यंत्रणा पूर्ववत करणे, हे मोठे आव्हान रेल्वेसमोर होते.
शनिवारी पहाटे अपघातग्रस्त डबे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले व सकाळी दादरकडे जाणारा जलदगती मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. तरी दादरहून कुर्ल्याच्या दिशेने जाणारा जलदगती मार्ग हा रेल्वे वाहतुकीकरता बंद होता. त्यामुळे भायखळा-दादर दरम्यान जलद लोकल या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. अपघातग्रस्त भागात काम सुरू असल्याने लोकलच्या वेगावरही मर्यादा ठेवाव्या लागल्या होत्या. या सर्व बाबींमुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते.
लोकल गाड्या अर्ध्या तासांपेक्षा जास्त उशिराने धावत होत्या. त्यामुळे ठाणे-कल्याण-बदलापूर-टिटवाळा या दरम्यानच्या अनेक रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. चाकरमान्यांना लोकल गाडीत चढणे अशक्य झाले होते. त्यामुळे ठाणे-मुंबई प्रवास करताना रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात येत होते. ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. काहींची सेवा ही मुंबईबाहेरच समाप्त करण्यात आली होती.
अखेर दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दादरहून कुर्ल्याकडे जाणारा जलद मार्ग हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला, असे रेल्वेने जाहीर केले. मुंबई-चेन्नई गाडी या मार्गावरून पहिल्यांदा रवाना करण्यात आली. त्यानंतर अपघातग्रस्त मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी गाड्या उशिरापर्यंत विलंबाने धावत होत्या. त्यामुळे संध्याकाळी गर्दीची वेळ येईपर्यंत लोकलचे वेळापत्रक हे सुरळीत झालेले असेल, अशी अपेक्षा आहे.
माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसने धडक दिल्याने पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रूळावरून घसरले. मुंबई ते मनमाड आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या ७ गाड्या रेल्वेने रद्द केल्या, तर मुंबईकडे येणाऱ्या चार गाड्यांची सेवा ही ठाणे, नाशिक रोड, पनवेल, मनमाड या ठिकाणी संपवण्यात आली आहे, तर दोन गाड्यांचे वेळापत्रक हे बदलण्यात आले आहे.
सिग्नल तोडल्याने झाला अपघात!
शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये जलद मार्गावरील रेल्वेमार्गाचे नुकसान झाले असून हा अपघात सिग्नल तोडल्याने घडला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गदग एक्स्प्रेसच्या लोको पायलट आणि त्याचा सहकारी याने सिग्नल लाल असतानाही तो ओलांडला. तो नीट पाहिला नाही व त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
दादर स्थानकातून बाहेर पडताच पुदुच्चेरी एक्स्प्रेसला ‘सीएसएमटी’हून आलेली गदग एक्स्प्रेस धडकली. त्यामुळे पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे मागील एस १, एस २ आणि एस ३ हे तीन डबे रुळावरून घसरले. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की, दोन्ही एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी गाड्यांबाहेर उड्या मारल्या़