Sunday, January 19, 2025

समाजकार्य

माधवी घारपुरे

कामिनीला घरी यायला आज फारच उशीर झाला. नववीत असणारी रिना, कॉलेजला जाणारा राजन आणि नवरा कपिल सारेच वैतागले होते. साडेआठ वाजून गेले. घरात जेवणाचं काहीच चिन्ह नव्हतं. सारं घर पसरलेलं. कामिनीच्या किटी पार्टीचा पसारा तसाच! रिनानं जेवढं आवरता येईल तितकं आवरलं. ‘बाबा, जेवायचं काय करू?’ असं रिना म्हणेपर्यंत कामिनीचा गृहप्रवेश झाला. घर बघून म्हणाली, ‘ओ गॉड, नॉट बॅड. जरा तरी आवरलेलं आहे. या समाजकार्याच्या धांदलीत घराकडं लक्ष राहत नाही, पण एक करायचं तर दुसरीकडे दुर्लक्ष होतं.’

कपिल म्हणाला, ‘आपली समाजसेवा आवरली असेल, तर जेवायचं काय आहे?’

‘हे बघ, लागट बोलू नको. त्याला तुला प्रतिस्पर्धी नाही.

माझ्या समाजकार्याची किंमत तुम्हाला नाही. पिकतं तिथे विकत नाही, हे खरं!’ कौतुक बाहेरच्याच लोकांना. पेपरच्या बातम्या बघा. मग कळेल काय ते.

‘बायका तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि तू चढतेस. ओले हरभरे त्या खातात. तुझ्या हाती रिकामा ढाळा!’ असं म्हणून कपिल हसला.

त्या सगळ्या माझ्यासाठी किती प्राऊड फील करतात! आज बाहेरून जेवण ऑर्डर करा. उद्या सकाळी मला आदिवासी पाड्यावर जायचंय. तिथल्या मुलांना वह्या, पुस्तकं वाटायची आहेत. मैत्रिणींना ही गोष्ट सांगताक्षणीच सगळ्यांनी २००/२०० रु. काढून दिले. शब्दावर पैसे द्यायला क्रेडिट असावं लागतं.

राजनला आता राहवेना. तो म्हणाला, ‘आई स्वत:चं कौतुक किती करून घेशील? तू सगळ्यांना ८००/८०० रुपयांचे त्या बर्बेक्यू नेशनचे जेवण दिलंस. हिशोब सरळ आहे. त्यांना ते जेवण २०० रुपयेत पडलं, समजतंय का?’

‘सगळं समजतंय, मी पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे. प्लीज कीप क्वाएट.’
प्रेस फोटोग्राफरला फोन करत होतीस, तुला मोठेपणाची झिंग चढली आहे. समाजकार्याच्या नावाखाली.
‘बाबा तुम्हाला कुणाला वेळ नाही दिलाय… म्हणून मी गप्प होते. खरं समाजकार्य ती करतेय सातवीपासून. हे तिसरं वर्ष…’

‘आई समाजकार्य करणारे कधी आपल्या तोंडाने बोलत नाहीत. समाजासाठी, गरजवंताना, पदरमोड करून कुठेही वाच्यता न करता केलेले कार्य ते समाजकार्य. इतकी सोपी व्याख्या आपल्या रिनाची आहे. ’

‘बाईसाहेब करतात तरी काय?’
वर्गातल्या तिच्या मैत्रिणीचे बाबा अचानक गेले. कामावर होते ते. आई स्वयंपाकाची छोटी-मोठी कामे करते. रिना आपली सगळी पुस्तके तिला देते आणि आपली कागदावर सगळी पुस्तके लिहीत असते. मूर्ख आहे, मला बोलली असतीस, तर दुसरा सेटच आणून दिला असता.
तेच तिला नको होतं. तुमच्या पैशावर केलेलं ते समाजकार्य नव्हे हा तिचा सिद्धांत म्हणून बोलली नाही आणि तिसरा चौथा नंबर सोडला नाही. शिवाय अभिमान नाही, याला म्हणतात समाजासाठी काहीतरी करणे.

कालच मी वाचलं की, श्रीरामांना विश्वामित्रांनी सांगितले. ‘अगस्तीने समुद्र गिळला. मारुतीने संजीवनीसाठी अख्खा पर्वत उचलला किंवा कुणी अग्नी भक्षण करणं एकदम सोपं, पण मन ताब्यात ठेवणं एकदम कठीण. माणसानं ‘अहम्’ विसरायला हवा. इतकंच नाही तर ‘मी अहम् विसरायला हवं’, तर ते समाजकार्य…

कामिनीला पुढे ऐकूच आलं नाही. तिच्या चेहऱ्यावर एक एक करत घामाचे थेंब गळत होते. तो अहं असावा कदाचित!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -