नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील झोपडपट्टी भागातील हजारो घरे अधिकृत नळजोडणीपासून वंचित होते; परंतु संरक्षण पात्र ठरत असलेल्या २०११ पूर्वीच्या झोपडपट्टीधारकांना काही पुरावे सादर केल्यानंतर वैयक्तिक नळजोडणी मिळणार आहे. विशेष म्हणजे नळजोडणीसाठी लागणारा खर्चदेखील ग्राहकांच्या आवाक्यात आहे. यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये अधिकृत नळजोडणीला मुहूर्त लागणार असला तरी अवैध इमारतीमधील नळजोडणीसंबंधी कोणताही निर्णय पालिकेकडून निर्गमित केला नसल्याने त्या जोडण विषयी काय? या प्रकारचा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला आहे.
संरक्षणपात्र असलेल्या झोपडपट्टी धारकांबरोबरच १ जानेवारी २००० नंतर; परंतु १ जानेवारी २०११ रोजी अथवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडीच्या संदर्भात अशा झोपडीतील प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीधारकाचे सशुल्क पुनर्वसन केले जाईल. या झोपडीधारकास सबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद क्षेत्रात परवडणाऱ्या किमतीत अशा झोपडीच्या बदल्यात पुनर्वसन सदनिका उपलब्ध करून दिली जाईल, असा निर्णय शासन स्तरावर झाला असल्याचे परिपत्रकात अभियांत्रिकी विभागाने नमूद केले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १ जानेवारी २०११ पर्यंतच्या झोपडी धारकांना वैयक्तिक नळजोडणी मंजूर करण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक यांनी १६ मार्च २०२२ रोजी मंजुरी दिली आहे.
यावेळी नळजोडणीसाठी पुरावे लागणार असून २०११पूर्वीची मतदार अंतिम यादीचा प्रमाणित उतारा, वीजजोडणीसंबंधी कागदपत्रे, मालमत्ता कर आकारणी केल्याचा पुरावा, अकृषिक कर / दंडाच्या रकमेची पावती, नोंदणीकृत असलेल्या झोपडपट्टीसह गृहनिर्माण संस्थेचे साहाय्यक निबंधकाने प्रमाणित केलेले भाग पत्र, वापरात असलेला झोपडीच्या क्रमांकाचा उल्लेख व कर पावती आदी पैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
२०११ पूर्वीच्या झोपडपट्टीधारकांनी नळजोडणीचा फायदा घ्यावा. परवडेल अशा दरात नळजोडणीची संधी आहे. अधिकृत नळजोडणीमुळे नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच नळजोडणी खंडित होण्याच्या दुर्दैवी घटना टाळता येणार आहेत.
– संजय देसाई, शहर अभियंता