‘होत्या व्यथा वेचल्या तरी
आसवेच निकामी…
विझल्या विस्तवाची
राखच ती निशाणी’
माणूस ही जाणीवच नाकारलेल्या समाजात आपण वावरतोय ह्याचा प्रत्यय जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा सगळी जगण्याची मूल्यं ढासळत होती. संपत्ती, कीर्ती, मान याहीपेक्षा ‘जात’ कुठेतरी पोसत होती. आज जग इतकं पुढारलं असतानाही ही विसंगती माझ्या नजरेतून सुटली नाही. काही गोष्टी आधीच मनावर बिंबवल्या आणि काही गोष्टी आपोआप मनाचा ठाव घेत होत्या. एकदा सोलापूरनजीकच्या कुठल्याशा देवळात दर्शनासाठी गेले असताना विचित्र अनुभव आला. देवाला आणलेलं अर्चनेचं साहित्य पाण्याने शिंपडून त्या देवावर वाहिलं जायचं, पण ज्याने आणलं त्याला शिंपडून देवाला हात लावण्याची सत्ता नव्हती, का तर ते पाप, कारण एकच, अजूनही ‘अस्पृश्य’ हा शब्द उच्चवर्णीयांच्या डायरीत
‘Red mark’ केलेला. कितीही मनाला हटकलं तरी ही विषण्णता गेले कित्येक दिवस मला अस्वस्थ करत होती. गावाकडचा देव आणि मुंबईतला देव ही गणना खालच्या वर्गासाठी वेगळी होती का? तिथे देवळाची पायरीही चढायची नाही आणि ‘इथे नांदते एकात्मता’ तसा हा मुंबईचा देव सर्वांना सारखा… मनाला कितीही उच्चवर्णीयांच्या ठिकाणी ठेवून बघितलं तरी नाही उकल होत ह्या सर्वांची. माणूस म्हणून सर्व अवयव सारखे, रक्त सारखं, मग हा भेदभाव आजही का? विशेषतः त्या जोगतिणी तुळजापूरच्या मंदिराबाहेर किंवा खंडोबाच्या मंदिराबाहेर कवड्यांच्या माळा गळ्यात घालून आयुष्यच कवडीमोल ठरणाऱ्या त्या या समाजात वावरताना दिसतात. कधी बदलणार हे चित्र?
आपल्यातलीच एक स्त्री जेव्हा जातीबाहेर जाऊन लग्न करते, तेव्हा खरं तर ह्या जाती नकळत उकलत जातात. एका ठिकाणी राहूनही ‘संस्कार’ या शब्दात फारकत होते आणि बुरसटलेल्या विचारांचा पगडा हे मनही स्वीकारत जातं. विसाव्या शतकातली आधुनिक स्त्री म्हणून मिरवणारी ‘मी’सुद्धा भोळ्याभाबड्या मनाने शेंदुरामागचा देव हुडकू लागते आणि एका अजाण जाणिवेने मन खंतावू लागतं.
चुलीत सारण सारून त्या धगीत पिठाच्या गोळ्यावर थाप मारणारी आणि डोईवरचा पदर ढळू न देणारी ती शेतातली आजी मन कासावीस करते. पिठाच्या गोळ्यावर हातावरच्या तळरेषा उमटताना ती आपलं भविष्य सर्वांसाठी वेचत असते, पण ह्याची साधी झळसुद्धा कोणाला स्पर्शत नाही. कोण्या भागीरथीचा नवरा तिला आजही गुराढोरासारखा बदडवतो; भीक मागायला लावतो, लोखंडी सळईचे घाव सोसत ती आपल्याच रक्ताला कुरवाळत बसते. हे लांच्छनास्पद जीणं ती जगते. तरीही समाज म्हणतो तिने नवऱ्याकडे नांदलं पाहिजे. स्वतःच्या आईलाही तोंडात बोळा घालून छातीवर बसून मारणारा भागीचा नवरा. त्याचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशा रुबाबात उजळ माथ्याने समाजात वावरतो. ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती कोणती? मग इथे समाज सुधारायला हवा की हा माणूस की ही विकृती? मुलीची पहिली मासिक पाळी आल्यानंतर तिला एखाद्या नवरीसारखं सजवून, मांडव घालून तिचं कोडकौतुक करणं, अख्ख्या गावाला तिचं वयात येणं हे कळणं ही प्रथा आजही चालू आहे. हे त्या मुलीसाठी किती मनस्वी लाजिरवाणं असतं, हे त्या समाजातल्या एकाही स्त्रीला कळू नये ?
‘एक स्त्रीच स्त्रीला
करतेय बंदिस्त
दिवस सरून तिच्यासाठी
फक्त रात्रीची गस्त…’
माझ्या माहेरच्या मधल्या गल्लीत एका कुटुंबातील एक अविवाहित मुलगी आज रस्त्यावर विटक्या कपड्यांनिशी फिरत असते. तिचं अस्तित्व माझ्या नजरेतून सुटलं नाही. खूप अस्वस्थ झाले. मग मी इतर ठिकाणी, माहेरी चौकशी केली तर कळलं की ती वेडी झालीय, पण मला तिच्यातला वेडेपणा दिसलाच नाही. मी जेव्हा जेव्हा तिला पाहिले तेव्हा तेव्हा ती दूर-दूर चालत असलेली आणि पाठमोरे हात एकमेकात गुंफून गहन विचारात असलेली. कित्येक प्रश्नांची उकल न झालेलं प्रारब्ध तिच्यासमोर होतं. मी का तिच्या अस्तित्वाने इतके बिथरत होते कुणास ठाऊक? कदाचित लहानपणापासून तिला पाहिलं होतं म्हणून असेल किंवा आपल्यातलीच एक म्हणून ती मनात घर करत होती. मध्यमवर्गीय चांगलं कुटुंब, राहणीमान चांगलं, बहीण-भावंडं चांगली, मग तिचं असं आपल्याच नजरेसमोर वणवण फिरणं आई-बापाच्या नजरेतून कसं सुटलं? तिला एक स्त्री म्हणून कितीतरी शारीरिक, मानसिक गोष्टींना सामोरं जावं लागेल याचं भान त्यांच्या कुटुंबातल्या एकालाही नसावं? ह्या एक ना अनेक प्रश्नांची शिदोरी मला वळणावळणाने वास्तव दाखवत होती.
संवेदनांची जाणीव प्रत्येकाला आहे. पण प्रत्येकाचं काळीज संवेदनाहीन झालंय. ‘भ्रूण’ हत्येसारखा विषयही खेडोपाड्यात जागृती निर्माण करू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञान आलं तरी माणसं आधुनिक व्हायला तयार नाहीत. आजही विस्तवाचं वास्तव स्वीकारतच स्त्री संसाराचा भार वाहतेय आणि पुरुषाच्या पुढे एक पाऊल टाकूनसुद्धा उंबरठ्यातच अडते आहे.
परसात तिने वेचल्या खुणा
त्याची ही कहाणी होती
तिच्या बागडल्या क्षणांची
का कुणास याद नव्हती…?’