भाषा नामक प्राणवायू

Share

डॉ. वीणा सानेकर

भाषा ही चारचौघांची, विशिष्ट वर्गाची किंवा शासनाची मालमत्ता नाही. ती कोणत्याही भाषक समाजाची अर्जित संपत्ती आहे. समाजाच्या अनेक घटकांनी, स्तरांनी ती आपापल्या पद्धतीने वाढवली व जोपासली आहे. आपल्या मराठीबाबतच बोलायचे, तर किती बोली, पोटबोली, त्यांचा अपरिमित शब्दसंग्रह, असंख्य म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, भाषेच्या बदलत गेलेल्या लकबी इ. हा सगळा आपल्या भाषेचा व बोलींचा पट इतका विस्तृत आहे की, तो समजून घेऊन मांडणे सोपे नाही. अधोरेखित करताना हे मांडणे मात्र आवश्यक आहे की, कोणतीही भाषा वाहत्या नदीसारखी असते. ती समाजाला देत-घेत वाढत असते. काळाच्या अनेक टप्प्यांवर तिचे रूप बदलत जाते. या भाषा नामक नदीचे पात्र इतके विशाल असते की, ते रिते होत नाही.

कोणत्याही भाषक समाजाच्या भरण-पोषणासाठी भाषा नामक नदी सतत खळाळत राहणे गरजेचे आहे. श्री. म. माटे यांच्या एका लेखात विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायाशी निगडित शब्द, रूपके कशी योजिली याचे मार्मिक वर्णन आहे. व्यवसायाशी संबंधित शब्द कसे मराठीत रुळले याची अनेक उदाहरणे या लेखात येतात. सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार, चोखा मेळा व त्याची पत्नी इत्यादींच्या अभंगांचे उल्लेख या लेखात येतात. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील उपमा, प्रतिमा, रूपकांचे अतिशय बोलके संदर्भ या लेखात सापडतात.

जात्यावरच्या ओव्या, स्त्रियांच्या खेळातली गाणी, सणांची गाणी, उखाणे यातून मराठीचे देखणे सौंदर्य उमटले आहे. एका समृद्ध संस्कृतीचे बहुविध पदर या सर्वांतून अलगद उलगडतात. समाजाच्या चालीरिती, परंपरा, रुढी यांचा आरसा म्हणजे आपली लोकगीते आणि लोककथा, भाषा या सर्वांतून सुट्टी काढता येत नाही. ती समाजाच्या समग्र परिघाला कवेत घेते. तिची मुळे संस्कृतीच्या मातीत खोल रुजलेली असतात. त्या मातीत परक्या भाषेचे कलम करून आम्ही झाडे रुजवायला सुरुवात केली. आपल्या भाषेच्या मुळांवर घाला घालून परकी झाडे रुजवायचा केवढा तो अट्टाहास!

इंग्रजांची गुलामगिरी संपली, पण इंग्रजीची काही संपेना. स्वखुशीने लादून घेतलेली गुलामी ती! तिच्या बेड्या दागिन्यांसारख्या मिरवतोय आम्ही. म. गांधींसारख्या महामानवाने सर्वार्थाने स्वदेशी, स्वराज्य आणि स्वभाषेचा आग्रह धरला. आपल्या भाषेतल्या पाठ्यपुस्तकांची गरज तीव्रतेने मांडली. परक्या भाषेतली पुस्तके नाकारून मातृभाषेतल्या पुस्तकांच्या निर्मितीची अपरिहार्यता का आहे, याकडे लक्ष वेधले. पाठांतर करणारे पोपट घरोघरी तयार होऊ नयेत म्हणून आपल्या भाषेतल्या शिक्षणाचे मोल सांगितले, पण एकूणच आमचा सबंध देश भाषिक गुलामगिरीतून मुक्त होऊ इच्छित नाही.

आपल्या महाराष्ट्रात साने गुरुजींची श्यामची आई इंग्रजीतून समजवावी लागणे, हा पराभव कोणाचा? मराठीत वाढदिवसाचे एकही गाणे आपण निर्माण न करता, ‘हॅपी बर्थ डे टू यू’ म्हणत केकवरच्या मेणबत्त्या विझवित राहतोय, हे जाणवलं कधी आपल्याला? मध्यंतरी हिंदी मीडियम नावाचा चित्रपट पाहिला होता. विषय वेगळा नि इरफान खानसारख्या कसलेल्या अभिनेत्याने त्यात नायकाची भूमिका केली होती. शिक्षण, देशीयता, मातृभाषा अशा पैलूंना केंद्रस्थानी धरून व्यावसायिक धर्तीवर चित्रपट निर्माण करणे हे किती सशक्तपणे हिंदीत घडले होते.

त्याही पूर्वी आम्ही मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते हिरिरीने चर्चा करायचो. मराठी शाळांचे प्रश्न मांडणारा, मराठी माध्यमाचे महत्त्व ठसवणारा चित्रपट मराठीत निर्माण झाला. एखाद्या लोकप्रिय नायक-नायिकेने भूमिका केली, तर तो चित्रपट किती मोलाची भूमिका बजावेल. लोकमानस मराठीच्या बाजूने उभे करण्याचे मोठे काम यानिमित्ताने होऊ शकेल. आम्ही यासाठी काही लेखक-कलावंतांच्या भेटी घेतल्या. कथा, दृश्य, संवाद अशी चर्चा पुढेही गेली. पण अशा विषयाकरिता पैसे उभे करणारा प्रायोजक पुढे येणे नि सापडणे सोपे नव्हते. पण ‘हिंदी मीडियमच्या’ निमित्ताने हिंदीत पुढे हे किती ताकदीने घडू शकले. आम्ही अजून हे मराठीत घडवता येत नाही म्हणून हळहळतोय. भाषा आणि संस्कृती या जाणीवपूर्वक

सांभाळण्याच्या गोष्टी आहेत. भाषा ही गोष्ट अशी आहे, जी जितकी समर्थपणे वापरत राहू तितकी ती वाढते. संस्कृतीबद्दल कवी गुलजार यांनी म्हटले आहे की, भाषेसोबत जोडल्या गेलेल्या संस्कृतीला विसरून चालणार नाही. आपल्या विचारांचा अनुवाद होऊ शकतो, पण संस्कृतीचा नाही. एक नवं रोप निर्माण करता येऊ शकेल, पण सुगंध कसा रुजवता येईल? संस्कृतीचेही तसेच आहे. ती आमच्या मुळांमध्ये सामावली आहे. संस्कृती म्हणजे शोभायात्रा, ढोल-ताशा, सणानिमित्ताने नऊवारी, फेटे यांचे देखावे नव्हे, संस्कृती हा आपल्या धमन्यांतून वाहणारा जीवनरस नि आपली भाषा हा आपला श्वास आहे.

Recent Posts

भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…

36 minutes ago

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…

2 hours ago

पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…

2 hours ago

कणकवली-करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार,२८ एप्रिल २०२५

पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…

3 hours ago

Pakistani YouTube Channel Banned: पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरू न देण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…

3 hours ago