Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीआता माथेरानचे पाणी महागले

आता माथेरानचे पाणी महागले

कर्जत (वार्ताहर) : देशातील सर्वात महाग पाणीदर माथेरानमध्ये आहे. येथे घरगुती वापरासाठी ४८ रुपये, संस्थांना ६२ रुपये, तर हॉटेल्सना १६२ रुपये दर आकारला जात आहे. हे दर कमी करण्यासाठी प्राधिकरणाला आर्थिक पॅकेज देण्याच्या मागणीचे निवेदन माथेरान महिला काँग्रेसने आमदार महेंद्र थोरवे यांना दिले. निवेदन दिले असल्याचे शिवाजी शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे माथेरानचे पाणी महाग झाल्याने पर्यटकांच्या घशाला कोरड पडली आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले माथेरान हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहराला पाणीपुरवठा करते. यासाठी नेरळ येथून उल्हासनदीचे पाणी अडीच हजार फूट उंचीवर पंप करून पुरवठा केला जातो. सदर पाणीपुरवठा स्कीमवर होणाऱ्या खर्चाच्या आधारे पाण्याचे दर प्राधिकरण निश्चित करते. घरगुती वापराचे दर तीन टप्प्यांत आकारले जातात. पाण्याचा दर १००० लिटरमागे निश्चित केला आहे. ० ते १५००० लीटर वापरासाठी रुपये २४.२०, यापुढील वापरासाठी २५००० लीटरपर्यंत असल्यास रुपये ३६.२० व २५००० लीटरच्या पुढील वापरासाठी रुपये ४८.७० इतका आहे. शाळा व इतर संस्थांसाठी रुपये ६२, हॉटेल्स सी क्लास रु. १०७.२०, बी क्लास रु. १२८.५०, ए क्लास हॉटेल्स रु. १६२.४० असा दर आहे.

मुंबई शहरालाही नाशिक, ठाणे जिल्ह्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबई पालिका चाळी व झोपडपट्ट्यांना रु. ४ व उच्चभ्रू हाऊसिंग सोसायट्यांना रु. ५.२० या दराने पाणीपुरवठा करते. या प्रचंड महाग दारातून दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने दर वर्षी दीड ते दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत प्राधिकरणाला करावी, अशी मागणी माथेरान शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा वर्षा शिंदेंनी केली आहे.

वेळेत पाण्याच्या दरात बदल न केल्यास नक्कीच पर्यटकांवर परिणाम होणार आहे. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन दिले असून यावर त्यांनी योग्य तो मार्ग काढण्यात यावा.

– शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक, माथेरान नगरपालिका

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -