मुंबई (प्रतिनिधी) : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धही नन्नाचा पाढा कायम राहिला आणि आयपीएलच्या १५व्या हंगामातील मुंबई इंडियन्सवर सलग सहाव्या पराभवाची नामुष्की ओढवली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या २६व्या लढतीत लखनऊचे २०० धावांचे आव्हान माजी विजेत्यांना पेलवले नाही. मुंबईची मजल २० षटकांत ९ बाद १८१ धावांपर्यंत गेली. विजेत्या संघाचा कर्णधार लोकेश राहुलची नाबाद १०३ धावांची खेळी निर्णायक ठरली.
फलंदाजांचे अपयश हे मुंबईच्या आणखी एका पराभवाचे प्रमुख कारण ठरले. कर्णधार रोहित शर्मा (६ धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला. दुसरा सलामीवीर ईशान किशननेही (१३ धावा) निराशा केली. आघाडी फळीतील डेवाल्ड ब्रेव्हिस (३१ धावा), सूर्यकुमार यादवसह (३१ धावा) मधल्या फळीतील तिलक वर्मा (२६ धावा) आणि अष्टपैलू कीरॉन पोलार्डने (२५ धावा) थोडा प्रतिकार करताना सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचून आणला तरी अवेश खानची (३ विकेट) तसेच अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर लखनऊने विजय खेचून आणला.
तत्पूर्वी, कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९९ धावा केल्या. राहुलने ६० चेंडूत ५ षटकार आणि ९ चौकारांसह नाबाद १०३ धावा केल्या. त्याचे यंदाच्या हंगामातील दुसरे आणि आयपीएलमधील एकूण तिसरे शतक ठरले. राहुलने क्विंटन डी कॉकसह ५२ धावांची सलामी देत लखनऊला दमदार सुरुवात केली.
मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या फॅबियन अॅलनने सहाव्या षटकात डी कॉकला २४ धावांवर बाद केले आणि पहिले यश मिळवले. डी कॉकच्या जागी आलेल्या मनीष पांडेने कर्णधार राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी करताना लखनऊला सुस्थितीत आणले. मुरुगन अश्विनने पांडेला ३८ धावांवर माघारी पाठवले. १७व्या षटकात जयदेव उनाडकटने मार्कस स्टॉइनिसला १० धावांवर २०व्या षटकात दिपक हुडाला १५ धावांवर बाद केले. राहुलला शतक करण्यासाठी शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. त्याने उनाडकटला चौकार मारला आणि शतक पूर्ण केले. मुंबईकडून उनाडकटने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.
अश्विनने आणि फॅबियनने प्रत्येकी एक विकेट मिळवली. लखनऊने पहिल्या १० षटकात ९४ धावा केल्या. उर्वरित तितक्याच षटकांत आणखी १०५ धावा जोडल्या. मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात खराब सुरुवात आहे. याआधी २०१४च्या हंगामात मुंबईने सलग पाच लढती गमावल्या होत्या. यंदा त्यात भर पडली.
राहुलचे अनोखे सेलिब्रेशन
राहुलने शतक झळकावल्यानंतर हेल्मेट तसेच बॅट मैदानावर ठेवली. तसेच त्याने हात कानांवर ठेवून डोळे बंद केले. त्याने यापूर्वी, अनेकवेळा अशाच प्रकारे शतकाचे सेलिब्रेशन केलेले आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू अयोज पेरेझ हादेखील अशाच प्रकारे सेलिब्रेशन करतो. बाहेरचा गोंगाट कमी करण्यासाठी मी हे असे करतो. असे करताना कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नसतो. मात्र बाहेर काही लोक आपल्यावर टीका करणारे असतात. ते आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे बाहेरचा गोंधळ कमी व्हावा म्हणून मी कान बंद करतो, असे राहुलने यापूर्वी सांगितले आहे.