Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरनवसाला पावणारी कोकणातील महालक्ष्मी

नवसाला पावणारी कोकणातील महालक्ष्मी

पारस सहाणे

जव्हार : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वेवळवेढे गावात मुंबई-अहमदाबाद महामार्गलगत महालक्ष्मी मातेचे मंदिर असून ते जागृत देवस्थान आहे. याबाबत अशी कथा सांगितली जाते की, एक आदिवासी स्त्री गर्भवती असताना वार्षिक यात्रेच्या वेळी नियमाप्रमाणे गडावर देवीच्या दर्शनाला जात असताना पोटात कळा आल्या आणि पुढे जाणे अशक्य झाले. देवीचे दर्शन चुकणार म्हणून तिने मातेची करुणा भाकली. त्यावेळी दृष्टांत देऊन देवीने तिला सांगितले की, पायथ्याशी मी आहे, तिथे दर्शनाला ये. पायथ्याजवळ येताच तिला झाडावरील मूर्तीचे दर्शन झाले. पुढे याच ठिकाणी मंदिर बांधले.

सप्तशृंगी पीठाप्रमाणे येथेही शिखरावर ध्वज रोवणे हे दिव्य समजले जाते. देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व १४०० फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रति वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री केला जातो. ध्वज लावण्याचा मान वाघाडी येथील सातवी कुटुंबाकडे आहे. हा ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी एक महिना मांसाहार अथवा मद्यपान पूर्णत: वर्ज्य करतो व ब्रम्हचर्य पाळतो.

जव्हारचे माजी नरेश कै. यशवंतराव मुकणे यांच्याकडून अनेक वर्षांपासून दर चैत्र शुद्ध पौर्णिमेला ५ मीटर लांब ध्वज, साडी, चोळी व पूजेचे साहित्य दिले जाते. फाल्गुन वद्य अष्टमीपासून चैत्र वद्य अष्टमीपर्यंत पंधरा दिवस यात्रा-उत्सव भरतो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री १२ वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी १२ नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो.

ध्वज लावण्याचे ठिकाण देवीच्या पूजेच्या डोंगरावरील स्थानापासून ६०० फूट उंचावर आहे. पुजारी तीन मैल चढणीचा रस्ता कापून पहाटे ३ वाजता डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो आणि सकाळी ७ वाजता परत येतो. ते दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात. ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो, तो सागाचा असून दर पाच वर्षांनी बदलावा लागतो.

डहाणूची महालक्ष्मी आणि जव्हारची महालक्ष्मी यांच्यातील साम्य

जव्हार हे संस्थान असून संस्थानचे राजे तिसरे पतंगशहा यांनी जव्हारच्या महालक्ष्मीची यात्रा सुरू केली होती. यात्रेनिमित्त दूरवरून व्यापारी, सर्कसवाले, डोंबारी, जादुवाले इत्यादी जव्हार येथे येत असत. सन १८९६ साली अनेक ठिकाणी प्लेगची साथ सुरू झाली होती. सदर साथ जव्हार भागात पसरू नये म्हणून राजे चौथे पतंगशहा यांनी बाहेरील व्यापाऱ्यांना जव्हार येथे येण्यास बंदी घातली. त्यामुळे साहजिकच या यात्रेचे स्वरूप हळूहळू कमी कमी होत गेले. ते इतके कमी झाले की, जव्हारची यात्रा कायमचीच बंद पडली. सन १९०७ नंतर सदर यात्रा डहाणूजवळील महालक्ष्मी (विवळवेढे) येथे सुरू झाली. डहाणूच्या महालक्ष्मीची जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खणानारळांनी ओटी भरून, साडीचोळी अर्पण करून, ५ मीटर लांब झेंडा चढवला जातो. ही प्रथा अजूनही चालू आहे. जव्हारच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच समोर असलेल्या खिडकीतून दूरवर नजर टाकताच महालक्ष्मी डोंगराच्या सुळक्याचे दर्शन घडते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -