डॉ. स्वप्नजा मोहिते
समोर उधाणता सागर… गेटवेवर आपटून असंख्य तुषारात उधळत जाणाऱ्या लाटा… समोर पडणारा फेनफुलांचा सडा… ओ! व्हॉट अ ब्लिस!! मी डोळे मिटून मनसोक्त नहातेय त्या फेनफुलांत! अचानक क्लिक आवाजाने मी डोळे उघडले, तर आजी मोबाइलवर माझा फोटो क्लिक करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भिजलेल्या रूपेरी बटा रुळत होत्या आणि गालावर ते खळीत बुडून जाणार हास्य! अरे देवा! मी गेटवेला या आजींबरोबर आलेय… पावसात भिजायला!
“किती मस्त सुंदर दिसतेस तू! आपल्याच विश्वात रमलेली… क्षणाचा मनसोक्त आनंद घेणारी… बालकवींच्या कवितेतल्या दवांत भिजलेल्या फुलराणीसारखी!” आजी कौतुकानं माझ्याकडे बघत होत्या. “आजी तुम्हीच तशा दिसताय… मस्त पावसाच्या थेंबांचे मोती जडवलेले आहेत तुमच्या चांदीच्या रूपेरी केसांत!” मला मस्त हसावसं वाटतय. हात उंच करून स्वतःभोवती गिरकी मारत गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणावसं वाटतय. “जिंदगी या अशा क्षणातच असते गं! मुक्त करावं मनाला आणि बेभानपणे झोकून द्यावं!” स्वतःभोवती एक गिरकी मारत त्या स्वतःतच मग्न… आत्ममग्न!
कतरा कतरा मिलती हैं… कतरा कतरा जीने दो… जिंदगी हैं… बहने दो… प्यासी हूँ मैं… प्यासी रहने दो!
त्या क्षणाची प्यास… आकंठ पिऊन घ्यावा तो क्षण आणि मग रमावं त्यांच्या आठवणीत! समुद्राच्या उधाणत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मी त्यांचा एक मस्त फोटो क्लिक केला…
त्यांच्या चेहऱ्यावर नितळ, निखळ हसू कायमचं कोरलंय का? माणसाचा चेहरा, केवढा मनाचा आरसा दाखवणारा असावा? मी त्यांच्या चेहऱ्यावर वेदनांचं प्रतिबिंब शोधतेयं. आत्ता तर भेटल्या या मला! कॅन्सर आहे, असं किती सहज सांगितलं त्यांनी! ना वेदनेचा लवलेश, ना शब्दांना दुःखाची किनार! नाहीतर कॅन्सर म्हटलं की, गळपटून गेलेली मंडळी मी पाहिलीत. जिंदगीचा ‘दि एन्ड’ जवळ आल्याची खंत पुढले कित्येक दिवस बाळगत, हे रडत कुंथत असतात. सहानुभूती दाखवणाऱ्यांची गर्दी सभोवताली बाळगत, यांचे दिवस ‘सरत असतात. जिंदगीमधली सगळी जिंदादिली विसरून… क्षण-क्षण रडण्यात घालवणारे!
आणि या आजी?? ओ गॉड!! मला आता त्या जामच आवडायला लागल्यात. गेटवेच्या भिंतीवरून पुन्हा एक प्रचंड लाट आपटून फुटते आणि आम्ही पुन्हा नखशिखांत भिजतो. “मॅडम आपका वो अल्बम रखो टॅक्सी में! मैं रुकता हूँ माँजी के लिये!” अरे देवा! हा टॅक्सी ड्रायव्हर पण थांबलाय यांच्यासाठी! “अरे हमे देर लगेगी…!” आजीचं मनसोक्त (आणि माझंही!!) भिजणं झालं की, निघू आम्ही! मी कुतूहलानं त्यांच्याकडे पाहतेय. माणसं जोडणं किती सहज जमतंय आजींना? “नहीं, रुकता हूँ मैं! रुकने का चार्ज नहीं चाहिए!” मी नव्या नजरेनं त्या पोरसवदा टॅक्सी ड्रायव्हरकडे पाहतेय. आमचं बोलणं ऐकलं वाटतं यानं टॅक्सीमध्ये? मी त्याच्या डोळ्यांतली आपुलकी वाचते. नकळत हातातली छत्री, पोर्टफोलिओ टॅक्सीत ठेवते.
जिंदगी ख्वाब हैं… फिर भी तू जिये जा… हर लम्हा बस तेरा हैं… तू युंही मुस्कुराये जा!! यूं तो राह में मिलेंगे रहगुजर… किसी को तो तू अपनाये जा!!
मी नकळत आजींचा हात हातात घेते. माझ्या डोळ्यांत पावसाचं पाणी उतरलंय का??
“तुला सांगते… या पावसाचं वेड माझ्या लहानपणापासूनच बरं का! हे खूप हसायचे मला! पाऊस सुरू झाला की, मी निमित्त काढून पावसात जायचे… भिजायला… यांना नाही आवडायचं भिजायला!” मला सौमित्रची एक कविता आठवली… त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो… ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो… मी तुला आवडते, पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही…
आजी आपल्याच आठवणीत बुडून गेलेल्या! “पण मी भिजायचे पावसात. पण त्याआधी यांना आल्याचा चहा करून द्यावा लागायचा, बरं का! आजींना पुन्हा हसू फुटलं! मी इमॅजिन करतेय, आजींचे हे व्हरांड्यात आल्याचा वाफाळता चहा पीत बसले आहेत आणि आजी अंगणात भिजत आहेत. यांच्या अंगणात एक भिजणारा प्राजक्त असणार, नाजुकशा केशरी पांढऱ्या फुलांचा… का कोण जाणे मला वाटून गेलं ! “हे गेले तेव्हाही पाऊस ठेवून गेले माझ्यासोबत. बाहेर अलवार पाऊस बरसत होता तेव्हा आणि यांच्या कॉटच्या बाजूच्या खिडकीतून पावसाचे थेंब यायला लागले. मी खिडकी बंद करायला उठले, तर नको म्हणाले.” म्हणाले, “तुझा पाऊस तुझ्यासाठी ठेवून जातो!” “शेवटी काय गं… मनात चांगला क्षण उमटणं महत्त्वाचं! बाकी इथेच सोडायचंय… क्लेश, दुःख, राग-लोभ, वेदना!” आजींच्या हाताची सूक्ष्म थरथर मला जाणवलीच. मी हळूवारपणे त्यांना बाजूच्या चहाच्या टपरीकडे वळवलं.
समोर वाफाळता चहा… त्याचा, आल्याचा मस्त गंध, त्या टपरीभोवती तरंगत होता. चहाचे ते छोटेसे कंगोऱ्याचे ग्लास हातात घेऊन आम्ही बसलो तिथे. “वो टॅक्सी वाले भैया हैं ना…उन्हे भी देना एक चाय!” मी चहावाल्याला सांगितलं. बिचारा केव्हाचा थांबलाय आमच्यासाठी! “आजी थंडी वाजते?” मी काळजीने विचारलं. “थोडी! या वयात शरीर थोडं कुरकुरतंच गं! त्यात तो पाहुणाही मध्येच जागा होईल. पण जाऊ दे! त्यालाही इथेच सोडून जायचंय!” त्या डोळे मिचकावत म्हणाल्या. माझ्या घशाशी काहीतरी दाटून आलंय ! नो टियर्स… नो टियर्स… मी स्वतःलाच बजावतेय.
“तुला ओशोंच एक वाक्य सांगते. ते म्हणतं… द रियल क्वेश्चन इज नॉट व्हेदर लाइफ एक्झिस्ट्स आफ्टर डेथ. द रियल क्वेश्चन इज व्हेदर यू आर अलाइव्ह बिफोर डेथ! मृत्यूनंतर जीवन आहे का हा खरा प्रश्न नाहीये. खरा प्रश्न हा आहे की, तुम्ही मृत्यूपूर्वी ‘जगताय’ का? किती सुरेख अर्थ आहे नं या वाक्यात?” चहाचा हळुवार घोट घेत त्या बोलत होत्या. “मृत्यू येणार म्हणून कण्हत कशाला बसायचं? मला ना ते मुन्नाभाई एमबीबीएस मधलं गाणं म्हणूनच आवडतं, बघ! देख ले… हर पल में
जीना यार सिख ले… जीवन के पल हैं चार… याद रख… मरना हैं एक बार… मरने से पहेले जीना सिख ले! त्यातली ती एक ओळ… पागल यह मत सोच, जिंदगी में कितने पल हैं… देख, हर पल में कितनी जिंदगी हैं… हे माझं आवडतं तत्त्वज्ञान आहे, बरं का!” त्या खळखळून हसल्या, तेव्हा माझा चेहरा खरंच बघण्यासारखा झाला असावा. हातातल्या ग्लासमधला चहा पार थंड होऊन गेला माझा. वॉव… काय मस्त बोलतात या! मी तर तो पिक्चर पाहून विसरूनही गेले होते. या, त्यातलं हे तत्त्वज्ञान जगताहेत स्वतः! पण कुठेही सहानुभूती मागण्याची भावना नाही की, आपल्या आजारपणाची चर्चा नाही. आहे ते स्वीकारून आनंद वाटत फिरायची आणि त्यातला आनंद घेत जाण्याची वृत्ती कुठून मिळवली यांनी?
मला माझे दिवसाची सुरुवात होण्यापासूनचे क्षण आठवले. आज काय नळाला पाणी नाही आले… पासून सगळ्या निगेटिव्ह गोष्टी कशा ठळकपणे जाणवतात आणि मी दिवसभर त्या निगेटिव्हिटीतच अडकून पडते, ते आठवलं. अरे आज किती मस्त सकाळ झालीय… पाणी भरायची कटकट नाही… मस्त गॅलरीत बसून चहा पित ऐकावं त्या शांत सकाळचं निसर्ग गीत… लेट मी एन्जॉय द मोमेन्ट… असं का नाही सुचत?
कतरा कतरा मिलती हैं… कतरा कतरा जीने दो… जिंदगी हैं! एक नवा अर्थ उमलतोय मनात! “काय गं… कुठे हरवलीस?” आजींच्या रूपेरी बटा मस्त त्यांच्या गालावर चिकटून बसल्यात. त्यांच्या डोळ्यांत मला माझी मीच नव्याने दिसत राहते. माझ्या मनात दडलेल्या सखीच्या चेहऱ्यावर पावसानंतरची उन्हं उतरलीत. “आजी चला घरी सोडते तुम्हाला!” माझ्या मनात नव्या चित्रांचे रंग उमटत चालले आहेत. अ वॉक इन द रेन्स! एक नितळ चेहरा… त्यावर उतरलेले पावसाचे मोती… केसांतून झिरपणारे थेंब आणि सभोवार उसळणाऱ्या सागराचे तुषार!
लेट अस वॉक इन द रेन्स… जस्ट यू अँड मी… नो मोअर सॉरोज… नो व्हिस्परिंग शॅडोज… विथ द सनशाइन शिमरिंग थ्रू द रेन्स… लेट अस वॉक इन द रेन्स! लेट द साँग ऑफ लाइफ रिफ्लेक्ट… थ्रू इच ब्रेथ, लेट द लाइफ सिंग… लेट द साँग ऑफ मेमरीज फ्लो… थ्रू यू अँड मी, फॉरएव्हर… लेट अस वॉक इन द रेन्स!!