अर्चना सोंडे
आर्ट एक्झिबिशन अर्थात कला प्रदर्शन हे अत्यंत क्लिष्ट समजले जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोजकीच मराठी माणसे कार्यरत आहेत. त्यात महिलांचं प्रमाण म्हणजे नसल्यासारखंच. आपल्या कोकणातील, सिंधुदुर्गातील कोकणकन्या या क्षेत्रात स्वबळावर शिरते आणि काहीच वर्षांत स्वत:चं अढळ स्थान निर्माण करते हे सगळं शब्दातीत आहे. निव्वळ ती स्वत:चं स्थान निर्माण करत नाही, तर या भारतीय कलाकारांना विक्रीचं व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये होण्यासाठी मदत करते. ही हॅण्डलूम एक्झिबिशन क्वीन म्हणजे आपल्या कोकणकन्या उज्ज्वल सामंत.
उज्ज्वल सामंत या मूळच्या सिंधुदुर्गच्या परुळेकर कुटुंबातील. नरेश परुळेकर, उज्वलचे बाबा शासकीय कर्मचारी होते. तर, आई ज्योती या गृहिणी. परुळेकर कुटुंब उच्चशिक्षित असल्याने उज्ज्वलची वैचारिक बैठक देखील पक्की झाली. ती विचारांनी समृद्ध होत गेली. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यावर तिचा विवाह सत्यजित सामंत या गिरगावातील उद्योजक असलेल्या उमद्या तरुणासोबत झाला. लग्नानंतर उज्ज्वलने एसएनडीटी विद्यापीठातून फॅशन डिझाइनिंग विषयात मास्टर्स डिग्री मिळवली. शिक्षणानंतर तिने आपल्या घरच्या उद्योगात व्यवस्थापन पाहण्यास सुरुवात केली. लग्नानंतर एका वर्षातच आदित्य या गोंडस बाळाचा जन्म झाला.
आदित्य १२-१३ वर्षांचा झाल्यानंतर उज्ज्वलला आता स्वत:चं वेगळं काहीतरी करावं, असं वाटू लागलं. घरचा व्यवसाय तर ती पाहतच होती. पण आपण ज्या विषयाचं ज्ञान घेतलंय, जी आपली आवड आहे ते पुढे न्यायचं तिने मनोमन ठरवलं. उज्ज्वलची आई प्युअर कॉटनच्या साड्या नेसत असे. हातमागावर तयार झालेली साडी त्यांना आवडायची. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या साड्या उज्ज्वलला नेहमीच इम्प्रेस करायच्या. त्यांच्या साड्यांची डिझाइन हा संशोधनाचा विषय होता. एव्हाना उज्ज्वलने हातमागावरील साड्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्या संदर्भात अनेक पुस्तके वाचली. संशोधन सुरू केले.
साधारणत: २००५-०६ चा काळ असेल. दस्तकारी हाट समितीच्या अध्यक्षा जया जेटली यांनी भारत सरकारच्या सहकार्याने हातमागासंदर्भात एक राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित केले होते. उज्ज्वल ते प्रदर्शन पाहण्यास गेल्या होत्या. हातमाग संदर्भात प्रदर्शन पाहणे हा उज्ज्वल यांचा आवडीचा विषय. अनेक प्रदर्शनांना भेटी दिल्याने अनेक विणकरांसोबत त्यांची ओळख झाली होती. अशीच एक विणकर होती अम्माजी. या राष्ट्रीय प्रदर्शनात त्यांना अम्मा भेटली. अम्माला कलमकारी या हातमागाच्या प्रकारात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. उज्ज्वलचं या क्षेत्रातील ज्ञान पाहून अम्माला अप्रूप वाटायचं. एक फॅशन डिझायनर म्हणून काहीतरी करायचंच होतं. किंबहुना कुटुंबातल्या महिलांच्या साड्या, ड्रेसेस उज्ज्वल डिझाइन करून द्यायच्या. शिक्षण घेऊन एक तप उलटून गेलं होतं. खूप काही बदललं होतं. उज्ज्वल प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करायच्या. तशी टीमच त्यांच्याकडे होती. या विणकरांसाठी मार्केटिंग आणि सेल्स या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन त्यांनी केलं, अगदी मोफत. मार्केटच नसेल तर आम्ही विकणार कुठे, या विणकरांच्या प्रश्नाने उज्ज्वल सामंत यांच्या व्यावसायिक आयुष्याचा ट्रॅक बदलला.
अंधेरीतील कार्यालयाच्या आवारात पहिलं हॅण्डलूम एक्झिबिशन त्यांनी भरवलं. त्यानंतर दादरला पहिलं व्यावसायिक प्रदर्शन भरवलं. पुढच्या वेळेस आर्ट एक्स्पोचं दुसरं प्रदर्शन भरवलं. यापूर्वी हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रदर्शन भरवले जायचे. मात्र अशा प्रकारे खासगी पातळीवर प्रदर्शन भरविणाऱ्या उज्ज्वल या पहिल्या मराठी उद्योजिका ठरल्या.
हातमागाचे कपडे हे महाग असतात, त्यामुळे ते एका वर्गापुरते मर्यादित असतात. त्या वर्गातले लोकच अशा प्रदर्शनांना भेटी देतात. हे समज उज्ज्वल यांनी दूर केले. सर्वसामान्य माणूस देखील त्यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात जातो आणि खरेदीही करतो. प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात त्यांनी सुमारे १०५ टेबल्सचं प्रदर्शन भरवलं होतं. सर्वोत्तम अशा विणकरांना येथे आमंत्रित केलं गेलं. हे प्रदर्शन यशस्वी ठरलं.
कुमारस्वामी हॉल सभागृहात हातमागाचं प्रदर्शन भरविणाऱ्या उज्ज्वल या कदाचित एकमेव मराठी महिला उद्योजिका असतील. भविष्यात हातमागावरील या कलाकुसरीचे प्रदर्शन ‘आर्ट एक्स्पो’ परदेशात भरविण्याचा उज्ज्वल यांचा मानस आहे. सर्वोत्तम सेवा, सातत्य, विनम्र स्वभाव ही त्रिसूत्री आचरणात आणणाऱ्या हॅण्डलूम एक्झिबिशन क्वीन उज्ज्वल सामंत यांना मानाचा मुजरा.