नवी मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील संडे स्पेशल (१७ एप्रिल) लढतीत गुजरात टायटन्ससह गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
गुजरातने पहिल्यावहिल्या हंगामात विजयाच्या हॅट्रिकसह पाच सामन्यांत चार विजय मिळवलेत. हैदराबादने त्यांचा विजयी वारू रोखला. मात्र मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सला हरवत केन विल्यमसन आणि सहकारी पुन्हा विजयीपथावर परतले.
चेन्नईसाठी १५व्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. रवींद्र जडेजा आणि कंपनीवर ओळीने चार पराभवांची नामुष्की ओढवली. कोलकाता, लखनऊ सुपर जायंट्स असो किंवा पंजाब, हैदराबाद. केवळ पराभव पाहावा लागला. मात्र बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध चेन्नईची सांघिक कामगिरी फळाला आली. गतविजेत्यांनी अखेर गुणांचे खाते उघडले. आता त्यांच्यासमोर सातत्य राखण्याचे आव्हान आहे.
कर्णधार हार्दिक पंड्यासह शुभमन गिलचा फॉर्म गुजरातसाठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मॅथ्यू वॅडे, विजय शंकर, मनोहर यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. गोलंदाजीतही लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमी वगळता अन्य बॉलर्सना प्रभाव पाडता आलेला नाही. प्रतिस्पर्धी चेन्नई संघ अपेक्षित फॉर्मात नसला, तरी गुजरातला त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
चेन्नईची भिस्त शिवम दुबेसह रॉबिन उथप्पावर आहे. त्यांचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड, कर्णधार रवींद्र जडेजासह अंबाती रायुडू, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ड्वायेन ब्राव्हो अद्याप फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. गोलंदाजीत ब्राव्हो वगळता अन्य बॉलर फ्लॉप ठरलेत. त्यामुळे विजयी कामगिरीत सातत्य राखायचे असेल, तर चेन्नईला सर्व आघाड्यांवर खेळ उंचवावा लागेल.
वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : एमसीए स्टेडियम, गहुंजे