Sunday, March 16, 2025
Homeसाप्ताहिककोलाजप्रेक्षकांसाठी मी त्यांच्या घरचीच सदस्य : रेणुका शहाणे

प्रेक्षकांसाठी मी त्यांच्या घरचीच सदस्य : रेणुका शहाणे

सुनील सकपाळ

लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे या झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाद्वारे बऱ्याच काळानंतर मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. १८ मार्चपासून शुक्रवार आणि शनिवार रा. ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या कार्यक्रमात त्या एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. पुनरागमन तसेच नव्या शोबाबत त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद.

प्रोमोजमधून कार्यक्रमाचं स्वरूप खूपच वेगळं दिसतंय, या कार्यक्रमाविषयी काय सांगाल?

कार्यक्रम अगदी वेगळ्या स्वरूपाचा आहे. भावी नववधू आणि नववर व त्यांचं कुटुंब हे या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यांच्यासोबत आम्ही काही मजेशीर खेळ खेळणार आहोत. तसंच या कार्यक्रमातून त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाच्या काही गमतीजमती प्रेक्षकांसमोर येतील. असा कार्यक्रम प्रेक्षकांनी या आधी पाहिलेला नाही आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील खूप उत्सुकता दिसतेय. कारण लग्न समारंभ हा नववधू आणि नववर यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे तो दिवस खास कसा होईल, याकडे कल असलेला हा कार्यक्रम आहे.

तुम्ही बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांना मराठी टेलिव्हिजनवर दिसणार आहात, त्यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक आहेत, कार्यक्रमातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?

हम आपके है कौन? सारख्या सुपरहिट चित्रपटामुळे मी जगतवहिनी झाली आहे किंवा मी असं म्हणून शकते की, मी आजपर्यंत जितकं काम केलं त्यासाठी प्रेक्षकांकडून मला आजवर खूप प्रेम मिळालं आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना मी त्यांच्या घरचीच सदस्य वाटते. माझी या कार्यक्रमातील भूमिका पण काहीशी तशीच असणार आहे. माझ्या भूमिकेचा उलगडा कार्यक्रमासोबत प्रेक्षकांना होईलच.

कार्यक्रमाच्या प्रोमोजनंतर प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय?

कार्यक्रमाचा प्रोमो रिलिज झाल्यापासून प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर मला पाहताना त्यांना खूप छान वाटतंय. तसंच प्रोमोजमधून कार्यक्रमाचा जो दिमाखदारपणा दिसला, त्याबद्दलही प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. लग्नाच्या अवतीभवती हा कार्यक्रम असून त्यात माझी असलेली भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते जाणून घेण्याची आतुरता आहे. मात्र, या भूमिकेतही प्रेक्षक मला स्वीकारतील, असा विश्वास आहे.

लग्नसोहळा हा अत्यंत जिव्हाळयाचा विषय असतो, लग्नातील अहेर ही सप्रेम भेट आणि आशीर्वाद मानले जातात, तुम्हाला अहेरात मिळालेली अशी कुठली अमूल्य वस्तू आहे जी तुम्ही आजही जपली आहे?

आमचं लग्न टिपिकल लग्न नव्हतं. आम्ही मंदिरात लग्न केलं, त्यामुळे त्या लग्नात खूप लोकं आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती, पण आम्ही अहेर स्वीकारला नव्हता. माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिलं होतं, त्यांनी दिलेलं ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. त्यामुळे ते पत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचा अहेर आहे, असं मी म्हणेन.

या कार्यक्रमात तुमच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर देखील असणार आहे, तुमच्या सॉलिड टीमबद्दल काय सांगाल?

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुष्कराज करणार आहे. आम्ही दोघे मिळून कार्यक्रमात एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण करणार आहोत. तसेच आमचं टायमिंग आणि गिव्ह अन् टेकमुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहताना प्रेक्षकांना मजा येणार आहे. पहिल्यांदाच मी पुष्कराजसोबत काम करतेय. प्रोमो शूट करताना आम्ही खूप धमाल केली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या पुढील प्रवासासाठी देखील मी तितकीच उत्सुक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -