चंद्रपूर (हिं.स.)- ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील आवळगाव येथील जंगलालगत शेतात काम करीत असताना वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगावच्या जंगलानजीक शेतात तुळशीराम सुकरु कांबळी (६७) हे शेतात उन्हाळी धान व मिरचीच्या पिकांना पाणी देण्यासाठी जाऊन वाकून पाणी देत असतांना आधीच शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात काही कळण्याआधीच शेतकरी तुलसीराम कांबळी हे गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन ब्रह्मपुरी येथे करण्यात आले.
जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे वन्यजीव नदी किनारी वास्तव्यास आहेत. त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांना २० हजारांची तातडीची मदत देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. सदर घटनेनंतर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे