श्री. नरेंद्र मोदी
माननीय पंतप्रधान, भारत सरकार
सा. न. वि. वि.
मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी हे विनंती पत्र. अभिजातता म्हणजे अलौकिक सौंदर्य! मी मराठी सारस्वताची सेवा गेली ५० वर्षे करीत आहे. १५४ पुस्तकांची लेखिका आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी आहे. यासाठी देह-मन कार्यरत ठेविले आहे. ज्ञानेश्वरमाऊली, तुकाराम महाराज, रामदास स्वामी मराठीला अभिजात लावण्य देणारे संत महात्मे-फुले, आंबेडकर यांनी घडविली मराठी भाषा! आपला वाढदिवस ६ सप्टेंबरला असतो. त्या दिवशी ‘अभिजात मराठी’ घोषणा केली, तर माझा आनंद त्रिगुणित होईल.
- मराठीचा अभिमान
- मराठीचे लावण्य
- मराठीचे सौंदर्य व मराठीचे जुने जाणतेपण.
दक्षिणी भाषांना अभिजाततेचा दर्जा आहे. आता मराठीला आपल्या कारकर्दीत हा दर्जा मिळो. ही सदिच्छा, विनंती, प्रार्थना.
अभिजातता, अपूर्व लावण्य हे शब्द मराठीला खूप लागू पडतात. दक्षिणी भाषांबद्दल मला अपार आदर आहे. पण मराठीबद्दल आईचे प्रेम आहे. आईचे दूध पिऊन, रस पिऊन मोठी झालेली आम्ही माणसं. आईचा अभिमान! ह. ना. आपटे, इंद्रायणी सावकार, सुमती क्षेत्रमाडे, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, ह. शि. खरात, सारे मराठी सारस्वताचे मानकरी. जीवात जीव असेपर्यंत मराठीचा गौरव करणारे ‘मराठी संत’. आणि आताच्या काळात प्रवीण दवणे, मी स्वत:, राजा राजवाडे, सदाशिव अमरापूरकर, श्यामला बनारसे, विद्या बाळ, विजया राजाध्यक्ष, विश्वेश अय्यर, अशी यादी न संपणारी!
मराठीला अभिजातता येण्याची सात कारणे तुम्हास पटणारी!
- जुनेपण
- जाणतेपण
- अलौकिक सौंदर्य
- भरीव भाषासौंदर्य
- ‘ज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’, ‘ययाती’,
‘विशाखा’, ‘अवेळ’ सारखी अपूर्वाई. - कथा, कांदबरी, कविता या सर्व क्षेत्रात
अलौकिकता. - असंख्य मराठी भाषिकांची विनंती आग्रह.
माननीय नरेंद्रजी, मी आपणास नम्र… आग्रहाची विनंती करते की, आपण मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळवून द्यावा.
प्रिय मराठी प्रेमींनो,
‘ही च ती वेळ, हाच तो संदेश
‘मराठीचा गजर’ आपला आवेश
कंठरवाने उच्चारू एकच उद्देश
‘मराठी मराठी’ मराठीचा आदेश
मी मराठी, आम्ही मराठी हा अभिनिवेश
हृदयस्थ आत्म्याचा आग्रही प्रवेश’
आता वेळ आलीय, मराठीचा गजर, मराठीची पताका मिरविण्याची. मराठीचा झेंडा फडकविण्याची.
“ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी, तुकयाचे अभंग
मराठी सारस्वताचे अलंकार, अमर, अजून दंग!
किती उधळले मोतिया, सोनियाचे हिरवे, पिवळे, रंग
आता ‘माझी मराठी’ उजळू दे दशदिशांचे अंग.”
चला, मराठीचा गजर करूया. मराठीचा आवाज उठवूया. आपले गडकरी साहेब, नारायण राणे साहेब केंद्रात आहेत. आग्रही भूमिका घेतली, तर काहीही अशक्य नाही. शेवटी, माझी मराठी मराठी,
माझी काशी नि पंढरी
तिच्यासाठी जागा दाटे माझ्या घरी, माझ्या उरी,
लावण्य मराठीचे, सौंदर्य अरुपाचे, तेजस भक्तीचे
राजस, लोभस, अलौकिक, पारदर्शी जाणिकांचे…
मराठीवरी प्रेम करणाऱ्या, प्रत्येक श्वासाचे,
प्रेमाचे, हट्टाचे!
‘मराठी मराठी मराठी’ जयजयकाराचे,
ध्वजाचे… झेंड्याचे…
– डॉ. विजया वाड (माजी अध्यक्ष, मराठी विश्वकोश)