सांगली : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच आज दुपारी सांगली आणि मिरज शहरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडला. सुमारे अर्धा तास धुवाधार पाऊस पडला. यामुळे द्राक्ष शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान अवकाळी पावसाने होत आहे.
विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊसही शहराच्या काही भागात झाला. त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला खरा. मात्र, अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने सांगलीकरांची मोठी दैना उडाली.
शनिवारच्या आठवड्या बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळी झालेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.