डोंबिवली (प्रतिनिधी) : या वर्षी उन्हाचा पारा दुपटीने वाढला आहे. याचा फटका जनतेला मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे यंदा घरगुती सरबत बनवून विक्री करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रस्त्यावर उभे राहून माठ किंवा थर्मासमध्ये हे सरबत मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे. उकाडा आणि उष्णता कमी होण्याचे नाव घेत नसून चिडचिड वाढविणारे वातावरण आढळून येत आहे. फळांच्या रसाबरोबर लिंबू पाणी, लिंबू सरबताला मागणी कायम आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी जोरात आहे. परिणामी घाऊक बाजारातील लिंबाची दरवाढ सुरू आहे. गेले आठ दिवस दुपारच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची बाजारपेठ सजली आहे.
माठ, टोप्या, रुमाल, शरीराला थंडावा देणारी फळे बाजारात दाखल झाली आहेत. महिन्यात उन्हाची तीव्रता किती राहील, याची चाहूल आतापासून दिसत आहे. भर दुपारी कडक ऊन पडत असून रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवत आहे. शहरातील बाजारपेठेत उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंची दुकाने लागली आहेत. सनगॉगल्स, टोपी, रुमाल यांचा खप वाढू लागला आहे. मातीचे माठ बाजारात विक्रीस आले असून सध्या त्यांच्या किमती परवडेल अशाच आहेत. तसेच फ्रीज, एअर कूलर, फॅन यांनाही मागणी होऊ लागली आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, सनग्लासेस यांची रस्तोरस्ती दुकाने थाटली गेली आहेत.
पाच हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंतचे विविध कूलर उपलब्ध झाले आहेत. अगदी ६० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत टोपी, गॉगल्सही वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहेत. याचप्रमाणे लिंबू सरबत, आवळा सरबत व कोकम सरबत विक्रीलाही उधाण आले आहे. १२ ते २० रुपये या सरबत खरेदीसाठी नागरिक मोजत आहेत. कोकणातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या कोकम सरबताचे कॅन विक्रीला ठेवण्यात आले आहेत.