
अजय तिवारी
राजस्थान हे काँग्रेसच्या ताब्यात असलेलं एकमेव मोठं राज्यं. तिथे पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने आतापासून तयारी सुरू केली आहे. त्यातच आता आम आदमी पक्षानेही तिथे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्या नेतृत्वाला आता त्यांच्या पक्षांमधूनच आव्हान मिळत आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसला पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये यश मिळालं होतं. त्यापैकी पंजाब, मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही तीन राज्यं काँग्रेसच्या हातून गेली. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी करण्याची विचित्र पद्धत काँग्रेसला नडली. नवज्योतसिंह सिद्धू यांना ज्या पद्धतीनं अधिकार दिले आणि जनमानसात स्थान असलेल्या नेत्यांची ज्या प्रकारे अवहेलना केली, त्यामुळे काँग्रेस सत्ताच्युत झाली. राजस्थानमध्येही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातही सत्तासंघर्ष सुरू आहे. तिथे राज्य पिंजून काढलं पायलट यांनी आणि मुख्यमंत्रीपदाची माळ पडली गेहलोत यांच्या गळ्यात. मध्य प्रदेशमध्येही तसंच झालं. ज्योतिरादित्य शिंदे यांना गृहीत धरण्याची किंमत काँग्रेसला मध्य प्रदेश राज्य गमावून मोजावी लागली. गेल्या साडेतीन वर्षांपासून पायलट यांची अवहेलना सुरू आहे. पक्षश्रेष्ठीही त्यांना गृहीत धरत होते. भाजपने निवडणुकीपूर्वी बहुतांश राज्यांच्या नेतृत्वात बदल केला होता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणाचाच काय तो अपवाद. मागे पायलट यांना दिल्लीत जाऊनही पक्षश्रेष्ठींनी भेट नाकारली होती. गेहलोत कायमच राहुल आणि सोनिया यांच्या आरत्या ओवाळणारे. कदाचित आता काँग्रेसजन अनुभवातून शहाणे झाले असावेत. आरत्या ओवाळणाऱ्यांपेक्षा जनमानसात स्थान असलेल्या नेत्याकडे पक्षाची सूत्रं हाती देण्याचा विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केला असावा. त्यामुळे तर राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पायलट यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
येत्या काळात सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस मोठी जबाबदारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पायलट यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचं सांगितलं जातं. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातले फेरबदल, मंडळं आणि महामंडळांमध्ये राजकीय नियुक्त्या झाल्यानंतर २०२३ मध्ये राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची स्थिती आणि आशा किती मजबूत आहे यावर बरीच चर्चा झाली. पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासमोर राजस्थानमधली पक्षाची नेमकी स्थिती आणि लोकांमध्ये असलेली सरकारची प्रतिमा याविषयी माहिती दिली. पायलट यांनी दोन्ही नेत्यांना राजस्थानमध्ये २०२३च्या विधानसभा निवडणुकीत मोठे बदल केल्याशिवाय भाजपशी स्पर्धा करणं आणि पुन्हा सत्तेत परतणं खूप कठीण आहे, याची जाणीव करून दिली. पायलट यांना राजस्थानऐवजी केंद्रीय पातळीवर मोठी जबाबदारी देण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी विचारमंथन करत असल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. युवा नेतृत्व ही प्रतिमा लक्षात घेऊन पायलट यांना पक्षाचे कार्याध्यक्ष करण्याचा विचार सुरू आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये पायलट यांनी घेतलेल्या कष्टाबाबत प्रियांका खूप खूश आहेत. याच कारणामुळे राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पायलट यांच्याशी देशातल्या काँग्रेसच्या स्थितीवर चर्चा केली. उत्तर प्रदेशमध्ये पायलट यांनी प्रियांका यांच्यासोबत प्रचार केला. त्यांनी केवळ गुर्जरबहुल जागांवरच नव्हे, तर राज्यातल्या बहुतांश भागात प्रचार केला.
प्रियंका यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितलं होतं की, पायलट यांनी निवडणुकीत खूप मेहनत घेतली. आता पायलट यांना मोठी जबाबदारी देण्याची त्यांची इच्छा आहे. पायलट यांना मात्र पक्षसंघटनेत मोठं पद नको आहे. त्यांना केंद्रातही पद नको आहे. त्यांना राजस्थानचं मुख्यमंत्रीपद हवं आहे. अशोक गेहलोत राजस्थानमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणू शकतील की नाही, या चर्चेनेही काँग्रेसच्या सर्वोच्च पातळीवर जोर धरला आहे.
काँग्रेसमध्ये ही स्थिती असताना भाजपमध्येही सारं काही आलबेल नाही. २०२३ ची निवडणूक मुख्यमंत्र्यांचा चेहरा घेऊन लढण्याचं आव्हान भाजपपुढे आहे. राजस्थान भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक चेहरे पुढे येत आहेत; पण वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवायला त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा विरोध आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान भाजपच्या नेत्यांनी जयपूरमध्ये बुलडोझरवर विजयी मिरवणूक काढली. त्यात वसुंधरा राजे गट सहभागी झाला नव्हता. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवस आधी वसुंधरा राजे शिंदे यांच्या गटाने मोठं शक्तिप्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शनानंतर राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह यांना भाजपमध्ये व्यक्तिवाद चालत नाही, असं म्हणावं लागलं. अशा स्थितीत राजस्थानमध्ये आतापर्यंत सामूहिक नेतृत्वाची रणनिती पुढे नेली जाऊ शकते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे चेहरे निवडणुकीत होते; पण सर्व राज्यांमध्ये मोदींचा चेहरा आणि राष्ट्रवादाची लाट या वेळी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यापेक्षा जास्त कामी आली. असं असलं, तरी जागतिक कविता दिनानिमित्त वसुंधरा राजे यांनी राजकीय बाणाबाबत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा एक भाग वाचला आहे. त्यात ‘पायऱ्यांना चालावे लागेल...’ असं म्हटलं आहे. ‘पायऱ्यांची चाल’ ही वाजपेयी यांच्या प्रसिद्ध कवितांपैकी ही एक आहे. वसुंधरा राजे यांच्या या ट्वीटचा काही भाग वाचल्यानंतर राजकीय वर्तुळात अर्थ काढला जात आहे. राजेंच्या या ट्वीटनंतर भाजप आमदारांची वक्तव्यंही समोर आली आहेत. माजी मंत्री वासुदेव देवनानी म्हणाले की, राजे यांनी व्यक्त केलेल्या भावना ठीक आहेत, कारण आम्ही पाऊल उचललं तरच गेहलोत सरकार पडू शकेल. कवितेचा राजकीय अर्थ शोधण्यावरून सध्या भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षाने पंजाबनंतर राजस्थान आणि गुजरातमध्ये नवीन अवकाश शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या परिस्थितीमध्ये राजस्थानचं रण कोणतं वळण घेतं ते आता पाहायचं.