गुवाहाटी (हिं.स.) : आसाममध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या वादळामुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. तसेच राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार राज्यामधील दिब्रुगड जिल्ह्यातील टिंगखान भागात वादळात स्कूटीवरून घरी जाताना झाड पडल्याने रुपेश कोच नामक इसमाचा झाला. तर टिंगखान येथील खेरनी गावात वादळात बांबूचे झाड पडल्याने ४ महिला मृत्यूमुखी पडल्या. त्यासोबतच राज्यातील तामुलपूर जिल्ह्यात वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.
घरातील तमूलचे झाड पडल्याने अंबारी पानबारी परिसरात एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. दारंग जिल्ह्यातील दाल गावात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तिनसुकिया जिल्ह्यातील दिग्बेई येथे वादळात जखमी झालेल्या तिखेश्वर सोनवालचा रुग्णालयात मृत्यू झाला. मोरीगाव जिल्ह्यातील विविध भागात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे पडल्याने वीज यंत्रणा ठप्प पडली होती.