पालघर (प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील जुचंद्र गावाची आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली श्री चंडिका देवीची यात्रा १८ ते २० एप्रिल २०२२ असे तीन दिवस चालणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे श्री चण्डिका देवीची यात्रा भरवली नव्हती. आता कोरोनाचे प्रतिबंध हटवण्यात येऊन राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे जूचंद्र ग्रामस्थ व श्री चण्डिकादेवी न्यास मोठा उत्साहाने यात्रेच्या तयारीला लागले आहेत.
तीन दिवस श्रींची पूजा, अभिषेक, संध्याकाळी धूप आरती असा दिनक्रम असणार असून भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने दर्शनाचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच श्री चंडिका देवी न्यासातर्फे विविध उपक्रम सुरू असून पुढील महिन्यात सामूदायिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष हरिहर पाटील यांनी केले.
यात्रेच्या निमित्ताने जुचंद्र गावातील प्रसिद्ध बावनचाल नाट्यमंडळ गेली ११७ वर्षे आपली नाट्यकला श्री चंडिका देवीच्या यात्रेमध्ये सादर करत असतात. यावेळेस पहिल्या आंघोळीच्या दिवशी सोमवारी १८ एप्रिल २०२२ रोजी लेखक दिरदर्शक मनोज वि. म्हात्रे लिखित दोन अंकी नाटक ‘मोबाईल’ चा प्रयोग सादर केला जाणार आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी देवीचा पालखी सोहळा असून त्या दिवशी लेखक राकेश के. भोईर लिखित आणि राजू र. पाटील, सुबोध भोईर दिग्दर्शित दोन अंकी मराठी नाटक ‘सरपाईज’चा प्रयोग ठेवण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी कुस्ती मंडळातर्फे कुस्त्यांचे जंगी सामने होतील. तसेच जुचंद्र गावातील रांगोळी कलाकारांचे यात्रेला सलग तीन दिवस रांगोळी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.