मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. पक्षीय राजकारणासोबतच जातीय आणि धार्मिक राजकारणाकडे नेत्यांचा कल आहे. दिवसेंदिवस अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार समोर येत आहेत. सगळीकडे केवळ टीका, आरोप , प्रत्यारोप हेच सुरु आहे. या सगळ्यात ज्यांनी आपल्याला मत दिलं, ज्यांच्यामुळे आपण नेते झालो ती सामान्य जनता कुठे आहे, त्यांचे काय सुरु आहे, त्यांच्या काही समस्या आहेत का याकडे कुणाचेही लक्ष नाही, अशी टीका अभिनेता संदीप पाठक याने केली आहे. याच अस्थिर आणि दूषित वातावरणावर अभिनेता संदीप पाठक भडकला आहे.
नाटक, चित्रपट, मालिका अशा तिहेरी माध्यमात आपल्या अभिनयाने चौकार, षटकार लागवणारा अभिनेता संदीप पाठक याने मनोरंजन विश्वात आपले स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. सध्या तो करत असलेल्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे प्रयोग वाऱ्याच्या वेगाने सुरु आहेत. रसिकांचे भरभरून प्रेम या नाटकाला मिळत असून नवनवीन भूमिकांमधून संदीप लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याच्या ‘राख’ या चित्रपटासाठी त्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. संदीपने आजवर अभिनयासोबत सामाजिक भान देखील जोपासले आहे. याच सामाजिक भानातून त्याने सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर ताशेरे ओढले आहेत.
संदीप पाठकने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नुकतंच एक ट्वीट करून या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ असे संदीपने लिहिले आहे. त्याच्या या ट्विटची बरीच चर्चा होत असून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर बऱ्याच चाहत्यांनी त्यांचे समर्थन केले असून सध्या सुरु असलेल्या राजकारणावर टीका केली आहे.