येत्या दीड महिन्यांत पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा जरी सुखावणारा असला तरी मुंबईकरांसाठी कित्येकदा तो फारच कष्टदायी ठरला आहे. विशेषत: मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अभूतपूर्व अशा मुसळधार पावसाने जगातील या मोठ्या शहराचे आणि या शहरावर राज्य करणाऱ्यांचे, येथील यंत्रणांचे, जनतेचे असे सर्वांचेच पितळ उघडे पाडले. धुवांधार पावसाने भारताच्या या आर्थिक राजधानीत एकच हाहाकार उडाला. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली व सारे जनजीवनच ठप्प झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांमुळे आक्रसलेल्या मिठी नदीने रौद्ररूप धारण केले आणि काठाची वेस ओलांडून ही नदी वाट मिळेल तशी दुथडी भरून वाहू लागली. अनेक वसाहतींमध्ये, इमारतींमध्ये पहिल्या मजल्यावर पाणी गेले. संपूर्ण मुंबईत हाहाकार उडाला. या अस्मानी संकटाने मुंबईकर हादरून गेले. अनेकांचे संसार पावसाच्या पाण्यात वाहून गेले, तर अनेकांना प्राण गमवावे लागल्याने अखेर ही आपत्ती कशी काय उद्भवली याचा सखोल अभ्यास करण्यात आला आणि मुंबई शहर व परिसरातील नदी-नाल्यांवर झालेले अतिक्रमण, पाण्याचा निचरा होण्यामध्ये अडथळा ठरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या अशी विविध कारणे पुढे आली. त्यावर तोडगा म्हणून ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत विविध कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच उपाययोजना केलेल्या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत.
पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी दर वर्षी नित्यनियमाने नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. या कामांसाठी नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरमध्येच निविदा प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर पालिकेतील स्थायी समितीच्या मंजुरीने काही कंत्राटदारांना कामांचे वाटप होते. नंतर कार्यादेश हाती पडल्यावर नालेसफाईची कामे सुरू केली जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने सुरू असलेली नालेसफाई हा कळीचा मुद्दा बनला आहे. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत करदात्यांनी कररूपात जमा केलेले कोट्यवधी रुपये नालेसफाईवर खर्च केले जातात. मात्र सखल भागांना जलमुक्ती मिळवून देण्यात पालिका सपशेल अपयशी ठरलेली दिसत आहे. पावसाळ्यात सखलभाग जलमय होऊ नयेत, नदी-नाले भरून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने मुंबईत नालेसफाईची कामे हाती घेण्यात येत आहेत. पण मुसळधार पाऊस पडल्यानंतर व्हायचे तेच होते. नदी-नाल्यांकाठचा परिसर जलमय होतो. सखल भागात पाणी साचते आणि मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला आहे. त्यामुळेच नालेसफाई कळीचा मुद्दा बनला आहे.
तसेच नालेसफाई दोन पाळ्यांमध्ये करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नालेसफाईदरम्यान काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी आणि निर्धारित ठिकाणी टाकण्यापूर्वी असे दोन वेळा त्याचे वजन करताना व्हीडिओ चित्रण करावे, अशी सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली. मुंबईमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईबाबत भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुंबईत सुमारे ३४० कि.मी. लांबीचे छोटे-मोठे नाले असून त्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात येते. दरवर्षी नाल्यांची एका पाळीमध्ये सफाई करण्यात येत होती. मात्र यंदा प्रथमच दोन पाळ्यांमध्ये नालेसफाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ही बाब चांगली म्हणायला हवी. कारण नालेसफाईसारखी अत्यंत महत्त्वाची व मोठी कामे नियोिजत वेळेत आणि चांगल्या प्रकारे होतील, अशी शक्यता वर्तवायला हरकत नाही. तसेच नालेसफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नालेसफाईदरम्यान काढण्यात येणारा गाळ काही दिवस नाल्याकाठीच ठेवण्यात येतो. त्यानंतर तो कचराभूमीत वाहून नेण्यात येतो. नाल्याकाठी ठेवलेला गाळ आणि कचराभूमीत तो टाकण्यापूर्वी अशा दोन्ही वेळी त्या गाळाचे वजन करतानाचे व्हीडिओ चित्रीकरण करावे, असे सक्त आदेश चहल यांनी दिले आहेत. मुंबईतील पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या मिठी नदीमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी आयुक्तांनी केली. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील बीकेसी जोडपुलाजवळच्या कॅनरा बँक कार्यालयासमोरील मिठी नदीत सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे सुरू असलेल्या साफसफाईच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली.
यंदा नालेसफाईच्या कामांबाबतचे टेंडर उशिराने काढण्यात आल्यामुळे नालेसफाईच्या कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली. पालिका दरवर्षी या नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून पालिका आयुक्तांना नालेसफाईची कामे बऱ्याच प्रमाणात झाल्याची खोटी माहिती दिली, असा विरोधकांचा दावा आहे. त्यामुळे आजही नाल्यात ५ ते ६ फूट इतका गाळ बाकी आहे. नालेसफाईची बरीच कामे झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र हा दावा खोटा असून आजही अनेक मोठ्या नाल्यांमध्ये गाळ साचलेला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून अधिकाऱ्यांमार्फत नालेसफाईची कामे पूर्ण करून घ्यायला हवीत. ‘नालेसफाईच्या आड, हातकी सफाई’ करून पालिकेला चुना लावणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकायला हवे. दरवर्षी २० मार्च रोजी सुरू होणाऱ्या नालेसफाई ऐवजी यंदा १५ दिवस उशिराने काम सुरू झाले आहे. मागील वर्षी १७ मे रोजी वादळ आले आणि नालेसफाई पूर्ण झालेली नव्हती. त्याचा फार मोठा फटका त्यावेळी बसला होता. त्याचा विचार करून यावेळी नालेसफाईच्या कामांना लवकर सुरुवात करणे गरजेचे होते. पण तसे न झाल्याने या वेळीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास नालेसफाईच्या झालेल्या कामांवर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. विशेष म्हणजे भाजपने नालेसफाईचे महत्त्व लक्षात घेऊन या मुद्द्याला हात घातला आणि नालेसफाईच्या कामांचा आढावा व पाहणी सुरू केली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे यंदा नालेसफाई योग्य तऱ्हेने होण्याची शक्यता दिसत आहे. नेमेचि येतो पावसाळा… या उक्तीप्रमाणे ‘सत्ताधाऱ्यांनाही लागलाय नालेसफाईचा लळा’ असे खेदाने म्हणावे लागते. कारण, सामान्यजनांच्या मते, ‘खरोखरीची करा नालेसफाई… नका करू हातकी सफाई’…