Sunday, May 18, 2025

महामुंबईराजकीय

महाआरतीसाठी शरद पवारांची परवानगी घेतली आहे का?

महाआरतीसाठी शरद पवारांची परवानगी घेतली आहे का?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच मनसेकडून महाआरतीचे आयोजन केल्यानंतर शिवसेनेकडून देखील दादरमध्ये अशाच प्रकारे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदा सरवणकर यांच्या माध्यमातून हे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये हनुमान जयंतीच्या महाआरतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केल्यानंतर त्यावरून मनसेकडून खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.


राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी देखील महाआरतीचे आयोजन केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हीच भूमिका त्यांनी ३ तारखेनंतर देखील कायम ठेवावी. आज महाआरती करत आहात. पण शरद पवारांची यासाठी परवानगी घेतली आहे का हे देखील तपासून घ्यावे. नाहीतर आज महाआरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील”, असे संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.


मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त दादरच्या हनुमान मंदिरात पूजा करण्यात आली. मनसेकडून हनुमान चालीसा पठण देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे विचारताच पोलीस आमच्यासोबत असल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment