बोईसर (वार्ताहर) : शहरातील अमली पदार्थ माफियाला अखेर बोईसर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या अमली पदार्थ माफिया विरोधात अनेक तक्रारी असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावाही पत्रकारांनी केला होता. यातच काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गांजा माफियाला ताब्यात घेऊन मोठा गांजासाठा ताब्यात घेतला होता याच प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे.
नागरिकांनी तक्रार करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून अमली पदार्थ माफिया निलेश सुर्वे हा खुलेपणाने आला गोरखधंदा चालवत होता. बोईसर पोलीस ठाण्याचे काही पोलीसही या माफियाला पाठीशी घालत असल्याचे दिसून आले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार हेमेंद्र पाटील व प्रमोद तिवारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यातच बोईसर पोलिसांना उशिरा का होईना आपल्या कर्तव्याची जाग आल्याने अमली पदार्थ माफियाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी १४ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण बोईसर भागात अमली पदार्थ विक्री करणारा मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतल्याने त्याच्या संपर्कात असलेले राजकीय पुढारी व हे अमली पदार्थ रॅकेट चालवणारे माफियांचा शोध पोलिसांना घेता येणार आहे.
स्थानिक पत्रकारांनी पोलीस कंट्रोल रूमला दिलेल्या माहितीनुसार ७ एप्रिल रोजी बोईसर पोलिसांनी साधारण ३ किलो गांजा ताब्यात घेतला होता. याचवेळी ताब्यात घेतलेल्या आरोपी सोबत निलेश सुर्वे याचा वारंवार मोबाईलवरून संपर्क असल्याचे पोलीस तपासणीमध्ये दिसून आले होते. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश खोंडे व त्यांची टीम मुख्य सुत्रधाराला निलेश सुर्वे याचा मागोवा घेत होती. यातच चार दिवसापासून बोईसर पोलिस आपल्याला ताब्यात घेतली या भीतीने निलेश सुर्वे आपले सर्व दूरध्वनी बंद करून भूमीगत झाला होता.
यातच याचे काही सहकारी गुरुवारी रात्री अमली पदार्थ विक्री करणाऱ्या अड्ड्यावर असताना पत्रकारांनी याबाबत कंट्रोल रूमला माहिती दिल्यानंतर या ठिकाणी पोलीस आले. त्यानंतर माया व अन्या नावाचे सुर्वेचे साथीदार या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. घटनास्थळी असलेली एक दुचाकीही पोलीस ताब्यात घेतली होती. यातच गुरुवारी सकाळपासूनच पोलीस उपनिरीक्षक योगेश खोंडे व त्यांची टीम निलेश सुर्वे याचा शोध घेत असताना बोईसर रेल्वे स्थानक परिसरातून दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
निलेश सुर्वे या आरोपीला ताब्यात घेतले असून अमली पदार्थाबाबत सर्व तपास सुरू आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल. – सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, बोईसर