
गौसखान पठाण
सुधागड-पाली : प्रवासी शेड नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर रणरणत्या उन्हात प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे दोन्ही बाजूंना प्रवासी शेड बांधण्याची मागणी अनेकजण करत आहेत. रुंदीकरणामुळे येथील मोठी सावली देणारी झाडे तोडली असल्याने प्रवाश्यांना कोणताच आधार राहिलेला नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाका हा महत्त्वाचा थांबा आहे. मुंबईकडे तसेच पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, रत्नागिरी व तळ कोकणात आणि गोव्याला जाणारी सर्व वाहने व एसटी इथे थांबतात. हा मार्ग पाली खोपोली राज्य महामार्ग व तेथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई बंगलोर महामार्गाला जोडतो. शिवाय, पाटणूस व ताम्हिणीमार्गे पुणे मार्गालादेखील जोडतो. पालीसह इतरही गावातील लोक, विद्यार्थी व चाकरमानी रोज मुंबई, पनवेल, पेण अलिबाग तसेच रोहा, कोलाड, माणगाव, लोणेरे, महाड व पोलादपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी वाकण नाक्यावर उभे असतात.
या मार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. या नवीन महामार्ग होण्याआधी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या झाडांच्या सावलीखाली प्रवासी थांबत होते. परंतु चौपदरीकरणामुळे येथील सर्व झाडे तोडण्यात आल्याने आता भर उन्हात व पावसात प्रवासी, विद्यार्थी, महिला व अबालवृद्धांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे हे सर्व प्रवाशी प्रचंड वैतागले आहेत. मात्र महामार्ग प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. वाकण नाका अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. रोज शेकडो प्रवासी येथे वाहनांची वाट पाहत उभे असतात. मात्र येथे साधे उभे राहण्यासाठीदेखील प्रवासी शेड नसल्याने त्यांचे खूप हाल होत आहेत. परिणामी येथे दोन्ही बाजूंना प्रवासी शेड उभारली जावी व प्रवाशांना दिलासा द्यावा. - दत्तात्रेय दळवी, अध्यक्ष, स्वयंपूर्ण सुधागड