
विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यातील केगवा बालापूर ग्रामपंचायत अंतर्गत पेसा कायदा व १५ वित्त आयोग अंतर्गत अनेक प्रकारची विकासकामे करण्यात आली. गावच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवत असते. परंतु या योजना लोकांपर्यंत पोहोचत नसून घरकुल योजना शबरी घरकुल प्रधानमंत्री घरकुल १५ वित्त आयोग, घर तिथे शौचालय, अंतर्गत विकास योजना, अशा गावाच्या विकासासाठी योजना येतात.
पंरतु त्याचा योग्य उपयोग होताना दिसत नाही. ग्रामपंचायतीच्या योजनेच्या ग्रामसभेला किती खर्च झाला, त्याची मान्यता घ्यावी लागते. परंतु ती घेतली जात नसल्याने मनमानी कारभार अधिकारी करत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. या मनमानी कारभाराच्या विरोधात माकपने आंदोलन या ग्रामपंचायतीवर केले.
१५ वित्त आयोग गावतर्गंत झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. घरोघरी पिण्याची पाण्याची सोय करण्यात यावी. खेडोपाडी दिवाबत्तीची सोय करण्यात यावी. ग्रामसभेत पेसा अध्यक्ष उपाध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष निवडण्यात यावा. घरकुलाची यादी प्रसिद्धी करण्यात यावी. रोजगार हमीची कामे मजुरांना मिळावीत, अशा अनेक मागण्या यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केल्या. या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी, असे मागणी कॉम्रेड किरण गहला, संजय ठाकरे, बाळ ठाकरे, रावजी वारंगडे गणपत गायकवाड, रघुनाथ मातेरा, संजय भोईर आदी कार्यकर्त्यांनी केली.
... तर पुन्हा ठिय्या आंदोलन
सदर मागण्यांची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार सुधारावा व येणारा निधी योग्यरीत्या वापरण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. हा कारभार सुधारला नाही तर ग्रामपंचायतवर पुन्हा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला, आंदोलकांनी दिला आहे.