मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला मोठा झटका बसला आहे. बाजार नियामक ‘सेबी’ने बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) यांना दंड ठोठावला आहे. कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड घोटाळ्याप्रकरणी सेबीने हा दंड ठोठावला. ‘सेबी’ने याबाबत आदेश जारी केला आहे.
‘सेबी’ने या आदेशात लिहिले आहे की, मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने कार्वी स्टॉक ब्रोकिंगकडून ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर रोखण्यासाठी वेळेवर पावलं उचलली नाहीत. तसेच या प्रकरणाच्या तपासात सुस्तपणा दिसून आला. त्यामुळेच ‘सेबी’ने हा दंड ठोठावला आहे. बीएसईला तीन कोटी रुपये आणि एनएसईला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं ‘सेबी’ने आपल्या आदेशात म्हटले आहे. कार्वी स्टॉक ब्रोकिंग या ब्रोकरेज कंपनीवर दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
या घोटाळ्याचे वर्णन ‘देशातला आजपर्यंतचा सर्वात मोठा इक्विटी ब्रोकर घोटाळा’ म्हणून केले गेले आहे. ‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार, कार्वी स्टॉक ब्रोकिंगने ग्राहकांच्या खात्यात ठेवलेले शेअर्स विकून आपल्या कार्वी रियल्टी या ग्रुप कंपनीकडे १,०९६ कोटी रुपये हस्तांतरित केले. एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१९ दरम्यान शेअर्स विकले गेले. त्यानंतरच सेबीने तपास केला तेव्हा हा घोटाळा समोर आला.
‘सेबी’ने सुरुवातीच्या तपासावेळी सांगितले होते की, ब्रोकरेज कंपनीने ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर केला आहे. सेबीने सांगितले की, परवानगी न घेता ग्राहकांना माहिती न देता, त्यांच्या सिक्युरिटीजचा वापर अन्य कारणांसाठी करण्यात आला. घोटाळा उघडकीस आल्यानंतर, ‘सेबी’ने कार्वी स्टॉक ब्रोकिंगला तत्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध केला होता.