वाडा (वार्ताहर) : जिजाऊ या शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने वाडा येथे आयोजित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे, युनियन बँक, महाराष्ट्र पोलीस व पुणे आर्मी संघांनी विजयी सलामी दिली.
नाना थोरात क्रीडांगणावर सुरू झालेल्या उद्घाटनीय पुरुषांच्या अ गटाच्या साखळी सामन्यात मध्य रेल्वेने मुंबई महानगर पालिकेला ३१-२९ असे चकवीत विजयी सलामी दिली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंटावेधक ठरलेल्या या सामन्यात मध्यांताराला १३-१२ अशी आघाडी रेल्वेकडे होती. गुरविंदर सिंगचा चतुरस्त्र खेळ मध्य रेल्वेच्या विजयात महत्वाचा ठरला. मुंबई पालिकेच्या आकाश गायकवाड याने कडवी लढत दिली. पण संघाला तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
ब गटात युनियन बँकेने ठाणे महानगर पालिकेला ३०-२६ असे पराभूत करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. विजय अनाफट, आकाश कदम यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने या विजयाची किमया साधली. विश्रांतीला १५-१३ अशी आघाडी बँकेकडे होती. अक्षय मकवाना, अतुल दिसले यांचा उत्कृष्ट खेळ ठाणे पालिकेचा पराभव टाळण्यात थोडा कमी पडला. महाराष्ट्र पोलिसने क गटात सेंट्रल बँकेला ४०-३१ अशी धूळ चारत आगेकूच केली. सुलतान डांगे, महेश मगदूम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर पहिल्या डावात २१-०९ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या पोलिसांना दुसऱ्या डावात मात्र कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले.
बँकेच्या अभिजीत घाटे, परदेशी यानी दमदार खेळ करीत पोलिसांना कडवी लढत दिली. पण संघाला पराभवापासून वाचविण्यात त्यांचा खेळ कमी पडला. पुणे आर्मीने ड गटात सीजीएसटी-कस्टमचा ३४-२८ असा पाडाव करीत आपली विजयी घोडदौड सुरू केली. मध्यांतराला २१-११ अशी आघाडी घेणाऱ्या आर्मीला उत्तरार्धात मात्र कस्टमने चांगलेच झुंजविले. पुण्याकडून नितीन चिले, सिद्धेश सावंत तर, कस्टमकडून सुनील दुबिले, ऋतुराज कोरवी, विकास काळे यांनी चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ केला.
१२ संघांतील १६८ खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत १२ संघातून १६८ खेळाडू सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धा नियोजनबद्ध होत असून याचा फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास निश्चितच होईल, अशी अपेक्षा फाटक यांनी व्यक्त केली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे, जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, भगवान सांबरे, भावनादेवी सांबरे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष पंडित पाटील, विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पिंका पडवले, जि. प. सदस्य संदेश ढोणे, हबीब शेख, पंकज देशमुख, शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील, डहाणू पंचायत समितीच्या सभापती स्नेहलता सातवी, वाड्याचे रघुनाथ माळी, मोनिका पानवे, हेमांगी पाटील, महेंद्र ठाकरे, शशिकांत पाटील, डाॅ. गिरीश चौधरी, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.