मुंबई : “जे कुठेच नाहीत, ज्यांनी आपला पक्ष दुसऱ्याला चालवण्यासाठी दिला आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. युवासेनेने महाराष्ट्रभर महागाईविरोधात थाळीनाद केला हे मनसेला दिसलं नाही. वसुली, कमिशन हा जो कांगावा सुरु आहे…. त्यांना वाटतं सारखं बोललं की ते लोकांना खरं वाटेल. मनसे आणि त्यांचे नेते लोकांसमोर उघडे पडले आहेत. लोकांना हे आपली भूमिका दर चार वर्षांनी बदलतात हे माहिती पडलं आहे. रंग बदलणे, झेंडे बदलणे सुरु आहे त्यामुळे कोणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही,” अशी टीका करत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी संदीप देशपांडेंना उत्तर दिले.
यावर संदीप देशपांडे यांनी भाजपासोबत युती करुन निवडणुका लढल्या आणि नंतर पवारांच्या मांडीवर जाऊन बसले त्यांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही, असे उत्तर दिले. थाळीनाद केला त्याचा परिणाम काय झाला अशी विचारणा त्यांनी केली. मनसे संपलेला पक्ष आहे सांगत त्यावर रोज बोलत राहतात असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या यशवंत जाधवांचे ३१ फ्लॅट सील होतात, इतकी संपत्ती कुठून आली? अशी विचारणा त्यांनी केली.
यावर मनिषा कायंदे यांनी लाव रे तो व्हिडीओचं काय झालं? अशी आठवण करुन दिली. तुम्ही महाराष्ट्रविरोधी असून तुमचा पक्ष दुसऱ्यांना चालवायला दिला आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहात आणि त्यातून मतं मिळवायची आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली. उत्तर प्रदेशातील लोकांना आकर्षित करण्यासाठी हनुमान चालिसा म्हटली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
यावर संदीप देशपांडे यांनी ही वायफळ बडबड असल्याची टीका केली. यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नाहीत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.