ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात कोरोनानंतर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असताना शहरात पाळीव कुत्रे पाळणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ठाणे शहरात जवळपास चार हजार पाळीव कुत्र्यांची वाढ ठाणे शहरात झाल्याचा अंदाज पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात आजच्या घडीला साडेचार हजार नागरिकांनी पशुवैद्यकीय विभागाकडून घरामध्ये कुत्रा पाळण्यासाठी परवाना घेतला आहे. घरामध्ये कुत्रा पाळण्यासाठी या विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले असल्याने हा परवाना घेतल्यानंतरच घरामध्ये कुत्रा पाळता येणार आहे. शहरात नेमके किती पाळीव कुत्रे आहेत, याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
पूर्वी घरोघरी जाऊन पाळीव कुत्र्यांची माहिती घेतली जात होती, तर कुत्र्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून ही माहिती घेतली जात होती. मात्र कोरोना काळानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन माहिती घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही माहिती घेण्यासाठी आता गृहसंकुलांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपापल्या गृहसंकुलामध्ये कोणत्या फ्लॅटमध्ये कुत्रा पाळण्यात आला आहे, याची माहिती पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला कळवावे लागणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ठाणे शहरातील सोसायट्यांना नोटीस देऊन सोसायटीमध्ये पाळीव प्राणी, त्याच्या मालकाचे नाव आणि इतर माहिती देण्याचे करण्याचे निर्देश दिले आहेत. पाळीव प्राण्याचा परवाना न घेतल्यास पाळीव प्राण्यांच्या मालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी नवीन नियमानुसार परवाना घेणे आवश्यक असून, ज्यांनी परवाना घेतला आहे, त्यांनी नवीन नियमानुसार परवाना नूतनीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांना त्रास
कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी किंवा तत्सम इतर गोष्टींवर ठाणे पालिकेने लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले. “शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुचाकी-चारचाकींच्या मागे लागणे, अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे, लहान मुलांचा चावा घेणे अशा घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.’’ शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असल्याचे मत ठाणेकर व्यक्त करत आहेत.