बोईसर (वार्ताहर) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून सायवन गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.१२ एप्रिल) रात्री नऊ वाजता दारू तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान दमण बनावटीच्या दारूसह ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी कार चालकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
डहाणू तालुक्यातील सायवन किन्हवली रस्त्यावरून मंगळवारी रात्री दमण बनावटीच्या दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार किन्हवली सायवन रस्त्यावरील सायवन गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला होता.
रात्री नऊ वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मारुती सिलेरियो कारची (एमएच -०१- सीव्ही ४३७९) तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असेलला तसेच दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठी असलेला २५.९२ बल्क लिटर विदेशी मद्यसाठा आढळून आला. कारसह एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान कारचालक सुरेश रामस्वरूप मंडल (वय-५०)आणि त्याचा साथीदार सागर पांडुरंग भोईर (वय-४२) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९चे कलम ६५(अ) (ई) ९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक पांडुरंग तुकाराम पडवळ, जवान संदीप पवार, भाऊसाहेब कराड, प्रशांत निकुंभ, अनिल पाटील यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.