सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेले हल्ला प्रकरण गाजत असतानाच आता मराठा आरक्षण प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना सातारा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणादरम्यान खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एका जुन्या दीड वर्षापूर्वी दाखल झालेले प्रकरण अॅड गुणरत्न सदावर्ते यांना चांगलेच महागात पडणार असे दिसत आहे.
सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर तारळे (ता पाटण) येथील राजेंद्र निकम यांनी त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अॅड. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.