Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखनारायण राणे : करोडोंचे आदर्श

नारायण राणे : करोडोंचे आदर्श

माननीय साहेब सर्वप्रथम आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या जन्मदिनानिमित्त पत्ररूपाने आपणांसमवेत संवाद साधावा या उद्देशाने हे पत्र लिहीत आहे. साहेब आपण करोडो लोकांचे आदर्श आहात त्यापैकी मी एक आहे. आपल्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन वाटचाल करणारे लाखो तरुण आहेत.

मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर लिखित माझ्या आवडत्या कवितेच्या ओळी मला नेहमी आठवतात. ‘पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा’ ही ओळ साहेब आपणांस पदोपदी लागू होते. माझ्यासारख्या अनेकांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहता आणि लढण्याची, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात संघर्ष करण्याची जी प्रेरणा आपण देता त्याची तुलनाच होऊ शकत नाही. प्रत्येक प्रसंगात आपण कसे वागता, कसे व्यक्त होता, कितीही मोठे संकटे आली तरी न डगमगता, न घाबरता धीरोदात्तपणे कठीणातील कठीण प्रसंगास सामोरे जाता हे पाहून आपल्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते.

वैयक्तिक माझ्या जडणघडणीवर आपल्या व्यक्तिमत्वाचा दीर्घ प्रभाव राहिला आहे. आपण ज्या सहजपणे तू ही गोष्ट शिक, तुझ्या व्यक्तिमत्त्वात ही सुधारणा कर, तुझे भविष्य उज्ज्वल आहे, मात्र त्यासाठी तुला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल असे आपण सांगता त्यावेळी नकळत आपले आई-वडीलच बोलत आहेत, असे वाटते. लहानपणापासूनच संत विचाराचा प्रभाव व संस्कार माझ्यावर राहिला आहे.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे थोरा मोठ्यांच्या सहवासात येण्यासाठी देखील पूर्वजन्मीचे पुण्य असावे लागते. साहेब आपला सहवास लाभणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल मानवतेने खोलवर कोण विचार करतो? मला आजही आठवते, एलएल.बी.च्या दुसऱ्या सेमिस्टर परीक्षेच्या वेळी मी आपणाकडून एक महिन्याची रजा घेतली होती. दिनांक १७ मे २०१६ रोजी माझ्या परीक्षेचा पहिला पेपर होता. आदल्या दिवशी दिनांक १६ मे २०१६ रोजी आपला मला फोन आला, तुझा उद्या पेपर आहे ना? नीट पेपर सोडव, तुला परीक्षेसाठी शुभेच्छा. आपला तो फोन माझ्यासाठी खूप अनमोल होता. आपल्या सहकार्य व मार्गदर्शनामुळेच मी एलएल. बी व एल. एल. एम करू शकलो.

शिक्षणासाठी आपण नेहमीच आग्रही असता. केवळ शिक्षणाद्वारेच माणूस आपली प्रगती करू शकतो ही आपली भूमिका आपण नेहमी आग्रहाने मांडता. जात, धर्म व पंथ यापलीकडे जावून प्रत्येकाने विचार करायला हवा आणि एकमेकांना माणुसकीच्या नात्याने सहकार्य करावे ही आपली भूमिका कोणत्याही संतपुरुष व देवपुरुषापेक्षा कधीच कमी नसते.

संत गाडगेबाबा नेहमी म्हणत असत “मी माणसात देव पाहतो”. अगदी तसेच मलाही “आपल्या रूपाने माणसात देव पाहता आला” हे माझे भाग्य आहे. आपल्या सहवासात एखादी व्यक्ती आल्यानंतर तिची भौतिक प्रगती तर होतेच मात्र त्याहून अधिक एक कुटुंबवत्सल आधारवड, माणुसकीचे नाते जपणारा, कोणाचेही वाईट न चिंतणारा, प्रसंगी विरोधकांच्या हाकेलाही ओ देवून त्यांच्या कठीणातील कठीण प्रसंगी धावून जाणारा एक सच्चा दिलाचा व मोठ्या मनाचा माणूस आपल्या रूपात मला भेटला.

भगवद्गीता या ग्रंथात ‘नारायण’ म्हणजे’ विश्वाचा गुरू असा अर्थ होतो. नारायण म्हणजेच ‘विष्णू’. सृष्टीचा निर्माता म्हणजेच ‘नारायण’. आपण आपल्या आजवरच्या वाटचालीत प्रत्येक गोष्ट स्वत:च्या ताकदीवर निर्माण केली आहे. ‘निर्मिती’ हा आपला स्थायीभाव आहे.

ज्या व्यक्तिमत्त्वाची ओळखच ‘निर्माता’ अशी आहे. ती व्यक्ती दीर्घकालीन कार्य करते. हाती आलेल्या सत्तेच्या आधारे आपण सिंधुदुर्ग, कोकण, महाराष्ट्र व देशात आज विधायक व लोकोपयोगी कार्य निर्माण करीत आहात. आपल्या व्यक्तिमत्त्वाची अजून एक बाजू जी मला आवडते ती म्हणजे आपण वास्तवापासून कधीही दूर जात नाहीत. मी केले असे म्हणण्यापेक्षा जे मी केले ते माझे कर्तव्य व जबाबदारी आहे, ही आपली भूमिका खूप काही सांगून जाते.

आपण सार्वजनिक भाषणात नेहमी सांगता की सत्कार माणसाच्या गुणांचा केला जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वात अधिकाधिक सकारात्मक गुण कसे आत्मसात करता येतील हे पाहणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या गळ्यात फुलांचा हार घातला जातो तेव्हा ती एक प्रकारे तुम्हाला तुमच्या जबाबदारीची व कार्याची जाणीव करून दिली जाते की या फुलांमध्ये जितक्या पाकळ्या आहेत तितक्या समस्या तुम्ही सोडवाव्यात.

साहेब आपण मनाने खूप संवेदनशील व हळवे आहात. सिग्नलला गाडी थांबली असता अचानक आपल्या गाडीजवळ एखादा गरीब मुलगा अथवा मुलगी येते त्यावेळी आपसूकपणे आपण त्याला मदत करता. त्याप्रसंगी तुमच्या चेहऱ्यावरील माणुसकीचा तो ‘भाव’ वेगळाच असतो.

“जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला”

साहेब आपल्या कृतीला साजेशा अशा या कवितेच्या ओळी मला नेहमी प्रेरणा देतात. शेवटी मी आपल्याकडून काय शिकावे? कुटुंबावर व कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर व समाजावर जीवापाड प्रेम करावे. त्यांना आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करावी. सतत वाचन करावे, शिकण्याची वृत्ती कधीही सोडू नये. जात, धर्म व पंथ याच्या पलीकडे जाऊन माणुसकी हा एकच धर्म आहे हा विचार मनी बाळगावा. खोटे कधीही बोलू नये. आर्थिक प्रगती करावी. मेहनती राहावे व आरोग्याकडे लक्ष द्यावे.

साहेब आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोष दूर करून अधिक सकारात्मक गुण कसे आत्मसात करता येतील हा प्रयत्न मी नक्की करेन. कोणताही मनुष्य १०० टक्के कधीच पूर्ण क्षमतावान नसतो. मात्र अखंड मेहनतीने तो आपल्या क्षमता विकसित करून आपली प्रगती करू शकतो. ही आपली शिकवणच माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. मी आपली ही शिकवण कृतीत उतरविणारच.

आपल्या आजवरच्या सहकार्याबद्दल आपला जन्मोजन्मी ऋणी असेन. आपल्या जन्मदिवसानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करतो.

– अमोल गवळी (नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री यांचे सहाय्यक खासगी सचिव )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -