कोल्हापूर : प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार झालाय तो अत्यंत निंदनीय आहे. बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील असून या कृत्याविरुद्ध कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे समरजीतसिंह घाटगे यांनी दिल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर देत हे सगळे प्रकरण समरजित घाटगे यांना महागात पडेल, असा धमकी वजा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.
यावेळी ते म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. आता हे झटका आल्याप्रमाणे उठले आहेत. ही जाहिरात गोकुळच्या संचालकांनी दिली आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यांनी माझ्या प्रेमापोटी ती जाहिरता दिली आहे. आम्ही शांत आहोत अन्यथा घाटगे हे आमच्या पासंगालाही पुरणार नाहीत, असा दमही मुश्रीफ यांनी दिला आहे.
गेल्या ५० वर्षांपासून मी राम नवमीला वाढदिवस साजरा करतो. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हसन मुश्रीफ म्हणजे वडाचे भक्कम झाड असून कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय वाढत नाही, असा टोला मुश्रीफांनी लगावला आहे. त्याचबरोबर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.