नालासोपारा (वार्ताहर) : वसईच्या कळंब येथील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या हत्येनंतर तिचा प्रियकराने बोरीवली येथे रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. लॉज मध्ये नेऊन प्रेयसीची हत्या करण्याची मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथील हर्षद फार्म हाऊस या लॉजमध्ये अभिषेक शहा (वय-२१) हा तरुण त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीसह बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला, मात्र परतलाच नाही. लॉजच्या मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
आरोपी अभिषेकने गळा आवळून तिची हत्या केल्याचे अर्नाळा सागरी पोलिसांनी सांगितलं. हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकराने संध्याकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली. हे जोडपे नालासोपारा पूर्वेच्या शिर्डी नगर येथे राहत होते. आरोपी प्रियकर अभिषेक त्याच्या प्रेयसीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत होता. मंगळवारी प्रेयसीने घरातून १५ हजार रुपये घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.