Tuesday, April 29, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखमहामानवाच्या स्मारकाची पूर्तता लवकरच होवो

महामानवाच्या स्मारकाची पूर्तता लवकरच होवो

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री बारा वाजता लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. डॉ. आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत, तर पक्षपात, अन्याय आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे मोठे समाजसुधारक होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे अत्यंत निष्ठावान अनुयायी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी सर्वप्रथम पुण्यात त्यांची जयंती साजरी केली. तेव्हापासून दरवर्षी १४ एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.

त्यामुळे आंबेडकरांना समतेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या महान कार्याची सदैव आठवण राहावी, त्याच्या कार्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांनी केलेल्या महान कार्यप्रती नतमस्तक होता यावे यासाठी दादर चौपाटीवरील चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांचे समाधीस्थळ असून ते लाखो अनुयायांसाठी श्रद्धास्थान आहे. या चैत्यभूमीसमोर असलेल्या इंदू मिल येथे बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचे काम सध्या सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करायला चैत्यभूमीवर दरवर्षी देशभरातूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लक्षावधी लोक येतात. दोन-तीन दिवस मुंबईत येणारा हा जनसमुदाय शिवाजी पार्क, दादर चौपाटी आणि चैत्यभूमी या परिसरात उघड्यावर राहतो. कारण त्यांच्यासाठी कोणत्याच किमान सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या नव्हत्या. या लोकांना किमान निवारा मिळावा, हा विचार सन १९८६मध्ये पुढे आला. त्यावेळी राजा ढाले, नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली होती. मात्र पर्यावरणासंदर्भातील अनेक प्रश्नांमुळे ही मागणी मागे पडली. नंतर २००३मध्ये हा विचार पुन्हा पुढे आला आणि तो एक राजकीय मुद्दा बनला. चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी जमणाऱ्या जनसमुदायासाठी जागा उपलब्ध व्हावी, ही मागणी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सन २००३ जोर धरू लागली होती. सन २००३च्या डिसेंबर महिन्यात ही मागणी व्हायला लागली आणि २००४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा उल्लेख करण्यात आला. तेव्हा हे स्मारक कुठे व्हावे, याची चर्चा सुरू झाली. तेव्हा इंदू मिलचे नाव पुढे आले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात इंदू मिलचा विषय आला खरा, पण सन २००४ ते २००९ पर्यंत त्याबाबत फारशी काहीच प्रगती झाली नाही. २००९मध्येही पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानेच इंदू मिलचा विषय ऐरणीवर आला.

पण त्यानंतरही काहीच प्रक्रिया झालेली दिसली नाही. नंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून मिलचा ताबा घेतला जाईल. ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले आणि २६ दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. इंदू मिलचा ताबा केंद्र सरकारकडे असल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात इंदू मिलच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत पत्रव्यवहार सुरू झाला. त्यादरम्यान इंदू मिलच्या जागेसाठी विविध आंदोलने सुरूच होती. या आंदोलनांची दखल घेऊन ५ डिसेंबर २०१२ रोजी आनंद शर्मा यांनी लोकसभेत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देत असल्याचे जाहीर केले. स्मारकासाठी विविध विभागांच्या आणि खासकरून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या परवानग्या सन २०१५ मध्ये मिळाल्या. स्थापत्यविशारद शशी प्रभू यांना इंदू मिलचा आराखडा तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले. पुढे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, सुलेखा कुंभारे, जोगेंद्र कवाडे, रावसाहेब दानवे अशी अनेक राजकीय व आंबेडकरी नेते उपस्थित होते. नंतर १६ मार्च २०१६ मध्ये शशी प्रभू यांनी सादर केलेल्या आराखड्याची चिकित्सा करण्यासाठी एकसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. एप्रिल २०१७ मध्ये समितीचा अहवाल प्राप्त झाला व आराखड्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, सन २०१८ पासून स्मारकाचे प्रत्यक्ष बांधकाम काम सुरू झाले आणि त्यासाठी सुरुवातीला २ वर्षांची कालमर्यादा आखून दिली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्मारक २०२० मध्ये लोकांसाठी खुले केले जाईल, असे जाहीर केले होते; परंतु ते काम त्या कालावधीत पूर्ण होऊ शकले नाही. नंतर सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जानेवारी २०२० रोजी स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले; परंतु सध्यातरी प्रकल्पाचे ४९.५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर स्मारकाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ६.६५ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. मार्च २०२४ मध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. स्मारकाची रचना व पुतळ्याच्या उंचीबाबत अनेकदा बदल करून आराखड्यात बदल गेले. डॉ. आंबेडकर यांच्या दादरच्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात आल्यामुळे सुमारे ३०० कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. गेली अनेक वर्षे या महामानवाच्या स्मारकाचे काम या ना त्या कारणाने रखडत आहे. त्यास आणखी विलंब होत गेला, तर प्रकल्पाच्या खर्चात तर वाढ होईलच आणि प्रकल्पाला विलंब होणे ही बाब सर्वांसाठीच लाजीरवाणी असेल. त्यामुळेच देशासाठी मानबिंदू ठरणारे हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणे हीच महामानवाला खरी आदरांजली ठरेल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आणि सर्व संबंधितांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -