Monday, July 22, 2024
Homeमहामुंबईआंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय सानपाड्यात

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय सानपाड्यात

नवी मुंबई : वाचनसंस्कृती वाढण्यासाठी अद्ययावत ग्रंथालयांची आवश्यकता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने एक पाऊल उचलले आहे. सानपाडा सेक्टर दहा येथे सिडकोकडून मिळालेल्या दीड हजार चौरस मीटर भूखंडावर येत्या वर्षभरात चार मजली इमारतीत आंतराष्ट्रीय दर्जाचे मध्यवर्ती ग्रंथालय उभारले जाणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित असून पालिका आयुक्तांनी या कामासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. येत्या आठवडाभरात यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण १९ ग्रंथालये आहेत. परंतु आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वाचनाबरोबरच दृक्‌श्राव्य माध्यमातून पुस्तके वाचण्याकडे कल वाढला आहे. सानपाडा येथे उभारण्यात येणा-या या ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अन्य भाषांतील पुस्तकेदेखील ठेवण्यात येणार आहे. ई-लायब्ररीच्या माध्यमातूनही येथे पुस्तके वाचता येणार आहेत. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष योजना येथे राबवल्या जाणार आहेत.

नव्याने पूर्ण झालेल्या ऐरोली येथील डॉ. आंबेडकर भवनातील एक भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित पाच हजार पुस्तकांचे दालन तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही पुस्तके डिजिटल माध्यमातूनदेखील वाचता येणार आहेत.

अशा असतील ग्रंथालयात सुविधा

  • १,७६५ चौ. मी. भूखंडावर उभारणी
  •  विविध दालनांमध्ये एक लाख पुस्तके, संदर्भग्रंथ
  •  ही शहराची सेंट्रल लायब्ररी असेल
  •  सनदी सेवा परीक्षांच्या उमेदवारांसाठी वाचनालय
  •  कॅफेटिरीया, अॅम्फीथिअटर सुविधा
  •  पर्यावरणस्नेही ग्रीन बिल्डिंगची बांधणी

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १९ ग्रंथालये आहेत. आता ग्रंथालयांची व्याख्या बदलत आहे. ई-बुककडे, दृक्‌श्राव्य माध्यमातून पुस्तके वाचण्याकडे कल वाढला आहे. ही पुस्तके या अत्याधुनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध केली जातील. नवी मुंबईकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरेल. – अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -