Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाहैदराबादची विजयाची हॅट् ट्रिक

हैदराबादची विजयाची हॅट् ट्रिक

एकतर्फी लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर ७ विकेट राखून मात

मुंबई (प्रतिनिधी) : कोलकाता नाईट रायडर्सला ७ विकेट आणि १३ चेंडू राखून मात करताना सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या १५व्या हंगामात विजयाची हॅटट्रिक साजरी केली. यंदाच्या हंगामात सलग तीन विजय मिळवणारा तो चौथा संघ ठरला. टी. नटराजनचा (३ विकेट) प्रभावी मारा तसेच राहुल त्रिपाठी (३७ चेंडूंत ७१ धावा) आणि आयडन मर्करमची (३६ चेंडूंत नाबाद ६८ धावा) फटकेबाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुकवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचे १७६ धावांचे आव्हान हैदराबादने १७.५ षटकांत ३ विकेटच्या बदल्यात पार केले. प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा (३ धावा) दुसऱ्या षटकात माघारी परतला. कर्णधार केन विल्यमसनने (१७ धावा) आक्रमक सुरुवात केली तरी त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील राहुल त्रिपाठी आणि आयडन मर्करम ही दुकली सनरायझर्सच्या मदतीला धावली. या जोडीने कोलकाताच्या बॉलर्सची धूळधाण उडवताना तिसऱ्या विकेटसाठी ९ षटकांत ९४ धावांची पार्टनरशिप रचताना विजय सुकर केला. राहुलने ३७ चेंडूंत ७१ धावा फटकावल्या. त्यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. मर्करमने ३६ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, हैदराबादने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याला प्राधान्य दिले. मध्यमगती गोलंदाज टी. नटराजनसह निकोलस पुरनने आघाडी फळी मोडीत काढताना पाचव्या षटकात कोलकाताची अवस्था ३ बाद ३१ धावा अशी केली. सलामीवीर वेंकटेश अय्यर ६ आणि दुसरा सलामीवीर आरोन फिंच ७ धावा काढून माघारी परतला. चौथ्या क्रमांकावरील अष्टपैलू सुनील नरिनही (६ धावा) लवकर बाद झाला. खराब सुरुवातीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने (२८ धावा) नितीश राणासह (५४ धावा) चौथ्या विकेटसाठी ३९ धावा जोडताना नाईट रायडर्सचा डाव सावरला.

 श्रेयस परतल्यानंतर नितीशने शेल्डन जॅक्सन आणि आंद्रे रसेलसह पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अनुक्रमे ३३ आणि ३९ धावांची भागीदारी जोडताना संघाला २० षटकांत ८ बाद १७५ धावापर्यंत पोहोचवले. नितीश राणाने सर्वाधिक ५४ धावांचे योगदान दिले. त्याच्या ३६ चेंडूंतील खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. रसेलने २५ चेंडूंत नाबाद ४९ धावा फटकावल्या. त्यात ४ चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश आहे. हैदराबादकडून टी. नटराजन (३ विकेट) सर्वात यशस्वी बॉलर ठरला.

हैदराबादने सलग तिसरा विजय नोंदवताना ५ सामन्यांतील गुणसंख्या सहावर नेली. सहाव्या सामन्यातील तिसऱ्या पराभवानंतर कोलकाता संघ (६ गुण) चौथ्या स्थानी घसरला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातनी ५ सामन्यांत ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. अव्वल चार संघांमध्ये त्यांच्यासह राजस्थान (५ सामन्यांतून ६ गुण) आणि पंजाबचा (५ सामन्यांतून ६ गुण) समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -