नवी मुंबई (प्रतिनिधी) : कर्णधार हार्दिक पंड्याच्या (नाबाद ८७ धावा) भन्नाट फॉर्मच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर ३७ धावांनी मात करताना गुजरात टायटन्स संघ पुन्हा विजयीपथावर परतला. कॅप्टनच्या बहारदार खेळीवर गोलंदाजांनी कळस चढवला. ५ सामन्यांतील चौथ्या विजयासह टायटन्सनी ८ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. दुसरीकडे, ५ सामन्यांतील दुसऱ्या पराभवामुळे राजस्थान संघ तिसऱ्या स्थानावर घसरला.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांच्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची मजल २० षटकांत ९ बाद १५५ धावांपर्यंत गेली. ओपनर जोस बटलरने (२४ चेंडूंत ५४ धावा) सातत्य राखले तरी अन्य फलंदाजांनी निराशा केली. दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला (०) यश दयालने खाते उघडण्याची संधी दिली नाही.
तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आर. अश्विनला लॉकी फर्ग्युसनने ८ धावांवर माघारी धाडले. कर्णधार संजू सॅमसन (११ धावा) गुजरातचा कर्णधार पंड्याच्या अचूक फेकीसमोर दुर्देवीरित्या धावचीत झाला. रॉसी वॅन डर ६ धावा काढून परतला. मधल्या फळीत शिमरॉन हेटमायरने (२९ धावा) थोडा प्रतिकार केला तरी तोवर आवश्यक धावा आणि अपेक्षित चेंडू यांच्यातील फरक वाढला. त्यामुळे गुजरातचा विजय पाच षटके शिल्लक असतानाच निश्चित झाला. गुजरातकडून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनसह यश दयालने प्रत्येकी तीन विकेट घेत विजयाला हातभार लावला. हार्दिकने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून राजस्थानने गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शुबमन गिल (१४ चेंडूंत १३ धावा) मॅथ्यू वेड (६ चेंडूंत १२ धावा) या बिनीच्या जोडीसह वनडाऊन विजय शंकरने (२ धावा) लवकर बाद करण्यात रॉयल्सच्या गोलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. आघाडी फळी लवकर परतल्याने राजस्थानची अवस्था सातव्या षटकात ३ बाद ५३ धावा अशी झाली. मात्र, फॉर्मात असलेला कर्णधार हार्दिक संघाच्या मदतीला धावला. त्याने ५२ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८७ धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिकचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे.
वैयक्तिक कामगिरीत सातत्य राखतानाच पंड्याने दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचताना संघाला सुस्थितीत आणले. हार्दिकने अभिनव मनोहरसह (२८ चेंडूंत ४३ धावा) चौथ्या विकेटसाठी अवघ्या ५५ चेंडूंत केलेली ८६ धावांची झटपट भागीदारी डावातील सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली. अभिनव परतल्यानंतर हार्दिक आणि डेव्हिड मिलरसोबत (१४ चेंडूंत नाबाद ३१ धावा) पाचव्या विकेटसाठी २५ चेंडूंत नाबाद ५३ धावा जोडल्या.