Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

दादर-माटुंगा स्थानकादरम्यान दोन एक्स्प्रेसची धडक

दादर-माटुंगा स्थानकादरम्यान दोन एक्स्प्रेसची धडक

गदग एक्स्प्रेसने दिली पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक


मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेस गाड्या समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उशीरा घडला आहे. यामध्ये गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्याने हा प्रकार घडला. धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे गदग एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.


मात्र या अपघातामध्ये कुणी जखमी झाले किंवा नाही, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.


रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने माटुंगा रेल्वे स्थानकात पाँडिचेरी एक्स्प्रेसला धडक दिली. त्यामुळे पाँडिचेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमध्ये अद्याप कुणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.


या अपघातानंतर मध्य रेल्वेची लोकल वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. दादर स्टेशनहून एक ट्रेन सुटत असताना दुसरी ट्रेन समोर आल्याने हा आपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी घाबरून गाडीबाहेर उड्या टाकल्या.


अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. अपघातानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. सर्व प्रवासी गाडीमधून पटापट उतारण्याचा प्रयत्नात होते. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान, दोन्ही गाड्यांचा वेग फारच कमी असल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे. घटनेनंतर तातडीने रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. त्यानी युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Comments
Add Comment