मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. दरम्यान निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रातील सुमारे तीनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या नाल्यांची आणि नद्यांची पावसाळा-पूर्व साफसफाई अधिक योग्य प्रकारे व वेळेत व्हावी, यासाठी नालेसफाईची कामे ही दरवर्षीप्रमाणे एका शिफ्टमध्ये न करता यंदा प्रथमच दोन पाळ्यांमध्ये करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
नालेसफाईच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याचेही चहल यांनी सांगितले. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी; गाळाचे वजन करण्यासह दोन्ही वेळी व्हिडीओ छायाचित्रण देखील करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गुरुवारी महापालिका आयुक्तांनी केलेल्या नालेसफाई पाहणीवेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, संबंधित उपायुक्त उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. दरम्यान चहल यांनी सर्वप्रथम मिठी नदीतील साफसफाई कामांसह संबंधित कामांची पाहणी केली. या अंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील ‘बीकेसी कनेक्टर ब्रिज’ नजिकच्या ‘कॅनरा बँक’ कार्यालयासमोरील मिठी नदी येथे सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली.
यानंतर त्यांनी धिरुभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने सुरू असलेल्या साफसफाई कामांची पाहणी केली तसेच गुरुवारच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे पूर्व परिसरातील उत्तर भारतीय संघ भवन जवळ असणाऱ्या वाकोला नदीमध्ये सुरू असलेल्या साफसफाई कामांची त्यांनी पाहणी केली. तर आजच्या दौऱ्याच्या शेवटी वांद्रे पूर्व परिसरातील वांद्रे टर्मिनस नजीक असणाऱ्या वाशी नाका नाला येथील कामांची पाहणी केली. तर ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे करण्याचे आदेश दिले असले तरी १५ मे पूर्वी नालेसफाई काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
आधीच महापालिकेवर प्रशासक नेमला असल्यामुळे नालेसफाईच्या प्रत्यक्ष कामाला उशीर लागला आहे. त्यातच पालिका आयुक्तांनी उशिरा का होईना नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे. भाजपने नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर अहवाल सादर केला होता. त्यानंतर गुरुवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला.