कुणाल म्हात्रे
कल्याण : मुस्लीम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालते. त्यांना मस्जिदच्या भोंग्यापासून त्रास होतो. अशा शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असल्या राजकारणाची गरज का पडली? असा सवाल राज ठाकरे यांना करत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला.
इरफान शेख १६ वर्ष मनसेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून राज ठाकरे यांच्या मनातील ब्लू प्रिंट, विकासाच्या भव्य दिव्य कल्पना आणि एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचे घडतेय हे सहज लक्षात येऊन जाते. पक्ष स्थापन झाला तेव्हा भूमिका होती की, जातीपाती विरहित राजकारण करायचे म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत. जीवतोड मेहनत देखील करत आहेत. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता. राज ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते. मात्र पाडव्याच्या सभेत वेगळेच काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटले असे भावनिक उद्गार इरफान शेख यांनी पत्रकाराशी बोलताना काढले.
इरफान शेख पुढे म्हणाले की, कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मदरस्यात शिक्षण होते. तिथे कधीच काही चुकीचे होत नाही. मी ही एक राष्ट्रप्रेमी आहे. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणे चुकीचे आहे. आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारखे आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.