ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष सण आणि उत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. सर्वच प्रमुख सणांवर कोरोनाचे सावट असल्याने घरातच राहून साजरे करण्याचे निर्बंध होते; परंतु यंदा सण आणि उत्सवावरील कोरोना निर्बंध हटविल्याने रमजान सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठाणे शहरात रमजान रोजासाठी मुंब्रा-कळवा ते राबोडी-हाजुरीतील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने घराबाहेर पडून दर्गाह आणि मस्जिदीत पाच रोजचा नमाज पडत आहेत व सायंकाळी उत्साहात कुटुंबीयांसह उपवास सोडत आहे. त्यामुळे सर्व मुस्लीमबहुल परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र, पाक महिना असतो. या काळात ते महिनाभर दररोज उपवास करतात. पाच रोजचा नमाज अदा करून अल्लाकडे आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी दुवा मागतात. सायंकाळी रोजा इफ्तारीने उपवास सोडतात. यंदाही गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुस्लीम मासारंभ म्हणजे रमजान रोजा सुरू झाला आहे. गेली दोन अडीच वर्षे घरात नमाज पठण करून रोजा साजरा करणारे मुस्लीम बांधव यंदा दर्गाह आणि मस्जिदीत दुवा करण्यासाठी व रोजा इफ्तारीसाठी बाहेर पडले आहेत.
यंदा कोरोना निर्बंध हटविल्याने दर्गाह आणि मस्जिदींमध्ये मुस्लीम बांधवांना वावर वाढला आहे. लोक आपल्या बांधवांना आणि मित्र परिवारांना भेटून रमजाम माहसाठी शुभेच्छा देत आहेत. सायंकाळी ४ ते ५च्या सुमारास किराणा दुकाने, फळ भाजी मार्केटमध्ये उपवास सोडण्यासाठी आवश्यक गोष्टीच्या खरेदीला जोर चढला आहे. मुंब्रा स्टेशन परिसर, राबोडी मुख्य मस्जीद, हाजुरी दर्गाह आदी भागांत लागणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.