ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पडलेल्या खंडामुळे यंदा बाबासाहेबांच्या जयंतीला उधाण आल्याचे दिसत होते. कोर्टनाका आणि ठाणे रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसागर लोटला होता.
ठाणे महापालिकेत पारंपरिक ढोल ताशे व बॅन्डच्या गजरात गुरुवारी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक पवन कदम अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपआयुक्त मारुती खोडके, उपआयुक्त जी. जी. गोदेपुरे, उपआयुक्त शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.