अॅड. मेघना कालेकर
विविध सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक बक्षीस योजना, बंपर योजना असतात. अशा वेळेच मोठी खरेदी केली जाते. घरात नवीन वस्तू, यांत्रिकी उपकरण आणले की त्याचे पॅकिंग बॉक्स-पुठ्ठे, थर्माकोल तसेच पडून राहतात. छोटेखानी कार्यक्रम केले की, त्यासाठी (use and throw) वापरा आणि फेकून द्या या वापराची भांडी (प्लास्टिक/थर्माकोलची ताट, वाटी, पेले) वापरले जातात. सण-समारंभाला वापरले जाणारे सजावटीचे साहित्य, धार्मिक श्रद्धेमुळे पाण्यात/नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, पी.पी.ई. किटपासून अनेक गोष्टी अशा कितीतरी अनेक वस्तूंची लांबलचक यादी या सर्व कशाच्या आहेत? तर बदलत्या जीवनशैलीने पर्यावरणाच्या विनाशाकडे चाललो आपण सर्व. पूर्वी नवजात बालकांसाठी घरगुती सुती कपडापासून केलेले कपडे, आपण सर्व वापरत असू ते कपडे नवजात शिशूच्या त्वचेला मिळते-जुळते होते, आता त्याची जागा डायपर/विविध नॅपकिन्सने घेतली.
पंगतीमध्ये पत्रावळ्या, केळीची पाने, पानांचे द्रोण इ. पर्यावरण पूरक वस्तू होत्या, आता थर्माकोल/प्लास्टिकचे कप, ताट, पेले सर्रास वापरले जातात. रेडीमेड अन्न, जेवण मागवायचे तरी अॅल्युमिनियम फॉईल, बटर पेपर, प्लास्टिक, थर्माकोल सहज वापरले जाते. कचऱ्याचे अनेक प्रकारे वर्गीकरण करता येईल, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या कचऱ्याचे करायचे काय? दिवसेंदिवस बिकट होणारा व पर्यावरण, तसेच सर्व जीव-सृष्टीला संपवणारा हा कचरा, आपल्या कल्पनेपलीकडे आपल्याला विनाशाकडे घेऊन चालला आहे. सुका कचरा-ओला कचरा असे ढोबळ वर्गीकरण बाजूला पडून आता, सुका कचरा, ओला कचरा, घातक कचरा, इलेक्ट्रिकल कचरा, वैद्यकीय कचरा, न वापरले जाणारे कपडे व इतर वस्तू बिघडलेल्या व रिपेअर न होणाऱ्या वस्तू उदा. विविध प्रकारची वाहने, ‘उपकरणे’, फटाके, अनेक प्रकारची रोषणाई, यापासून उत्सर्जन होणारा कचरा.
आपणच आपल्या जन्मापासूनचा प्रवास पाहिला, तर मृत्यूपर्यंत कचरा वेगवेगळ्या रूपात आपल्या सोबत असतो. रस्त्यावर जाता-येता जन्मसिद्ध हक्क असल्यासारखी थुंकण्याची वृत्ती आणि ती जोपासणारे महाभाग. केवळ आपले स्वतःचे घर स्वच्छ करून आपला परिसर अनेकदा दुर्लक्षित राहिला जातो. पर्यावरणप्रेमी व पर्यावरणस्नेही आपली जीवनशैली नष्ट होत चालली आहे. पूर्वी नदीच्या पाण्यामध्ये ओंजळ भरून स्वच्छ पाणी पिऊन तृप्ती मिळत असे. आता बाटलीबंद पाणी घेतल्याशिवाय स्वच्छ पाण्याची खात्री वाटत नाही. स्वच्छतेचा आग्रह आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यांची सांगड कमी पडते. अनेक ठिकाणी पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जातात. त्यांचे व्हीडिओ तसेच त्यांची माहिती देणारे मेसेजेस आपण सोशल मीडियावर पाहतो. तर काही जण या कचऱ्यापासून रोजगारनिर्मिती होऊन पर्यावरण वाचवण्यासाठी काही हातभार लावता येईल का? या दृष्टीने प्रयत्न करतात. पण यात सामूहिक, वैयक्तिक प्रयत्न वाढवले गेले पाहिजेत.
सुका कचरा :
कागद, पुठ्ठे, बॉक्सेस, थर्माकोल, प्लास्टिक यांच्या पलीकडे न लागणारे कपडे मग ते साधे असो वा भारी यांची भर पडू लागली. मोठ्या समारंभासाठी वापरले जाणारे भारी, विविध कालाकुसर केलेले आकर्षक कपडे, तसेच विविध वयोगटातील कपडे, चपला, बूट, स्लिपर्स यांची भर पडते.
ओला कचरा
खरे तर या कचऱ्याला जीवनावश्यक खतच म्हटले पाहिजे. कारण यातूनच निसर्गाच्या पुनरुज्जीवनासाठी लागणारे सेंद्रिय खत तयार होते. भाजीपाला पिकवण्यासाठी या खताचा वापर आरोग्यदायी आहे.
घातक कचरा
यामध्ये इलेक्ट्रिक, फोन, चार्जर, संगणक व इतर साहित्य. काचेच्या वस्तू, फुटलेल्या काचा, विविध प्रकारचे बांधकाम साहित्य, गंजलेले साहित्य, कारखान्यातील विविध उद्योगातील नको असलेले विविध यंत्रे, यांचा पुनर्वापर कसा कितपत होईल याची फारशी माहिती नसते. घरातील अनेक वस्तू-यंत्रे, उपकरणे यात येतात. कधी-तरी या वस्तू आपल्याला लागतील म्हणून आपण जपून ठेवतो. पण किती वापर होतो याचा नंतर? भंगार सामान व फर्निचर सामानाचे ढीग अनेकदा रस्त्याच्या कडेला आपण पाहतो. जंगल अथवा मानवी वस्तीमध्ये लागणारे वणवे, अग्नी-प्रकोप, अग्नी-तांडव यांचे शमन करणारी यंत्रणा हा सगळा पर्यावरणावर येणारा ताणच आहे.
वैद्यकीय कचरा
आपले दैनंदिन जीवन वैद्यकीय क्षेत्रासोबत जोडले गेले आहे. विविध जैविक कचरा, वैद्यकीय साहित्य, त्यातील सर्व उपकरणे, विविध निर्जंतुक करणारे किट अगदी मास्क, हातमोजे, बेबी डायपर, सॅनिटरी नॅपकिन्स, ज्येष्ठांसाठीचे डायपर, कधी अपघात अथवा एखाद्या अप्रिय-अचानक घडणाऱ्या निसर्गप्रकोपामधून झालेली दैन्यावस्था, त्यात सापडणारे सर्व प्रकारच्या जीवांचे, सजीवांचे अवशेष या सर्वांचे योग्य ते विघटन करण्याची व्यवस्था या सर्व गोष्टी वैद्यकीय क्षेत्राला आव्हान देणाऱ्या आहेत. विविध रसायन, औषध, गोळ्या यांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या वस्तू सॅनिटरी नॅपकिनच्या नैसर्गिक विघटनासाठी वापरली जाणारी यंत्रणा यांची माहिती मिळते. पण त्यातून फारसे काही पुढे जात नाही. प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी यंत्रणा राबवली पाहिजे. अनेक राज्यात याच्या विघटनाच्या विविध पद्धती पाहायला मिळतात. या पद्धती सोप्या पद्धतीने सर्वांना सहज वापरता येण्याजोग्या केल्या पाहिजेत. ठरावीक काळानंतर बाजारात अनेक नवनवीन ब्रँडच्या वस्तू येतात, विविध बक्षीस योजना, काही ठरावीक काळानंतर आपल्या व आपल्या सदस्यांच्या बदलेल्या वयोमान, शरीरयष्टी तसेच आवडीप्रमाणे खरेदीचे स्वरूप बदलते.
जागतिकीकरणामुळे अनेक देश-विदेशातील विविध वस्तू ऑनलाइन मार्केटमुळे पुढच्या क्षणाला उपलब्ध होतात. पण त्यातून उत्सुकता, नवलाई व वापर संपला की त्याची कचऱ्याकडे त्याची वाटचाल होते आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा या कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाट अथवा वाहतूक करणारे समाजातील घटक, आपल्या दारोदार येणारे, कचरा जमा करणारे सेवेकरी, घंटागाडी यांच्यापासून ते ज्या ठिकाणी या कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे या सर्वांपर्यंतचा प्रवास अवघड आहे. किमान “माणूस” म्हणून तरी या “घटकांना” वागणूक मिळते का? सोसायटी अथवा परिसरातले ड्रेनेज साठल्यावर संबंधित यंत्रणेला धारेवर धरणारे आम्हीच, ते साफ करणाऱ्या व्यक्तीला तसे प्रशिक्षण ज्ञान आहे की नाही याची माहिती अभावानेच असते, यामध्ये अनेकदा अनेक घातक रासायनिक वायू तयार होतात, त्यात हे कर्मचारी गुदमरून जीव गमावतात. या घटकांना व त्यांच्या परिवारांना योग्य तो मोबदला, कायमस्वरूपी संरक्षण मिळाले हवे. विविध रासायनिक घातक वायूंचे सर्व जगातून सातत्याने उत्सर्जन होत असणे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक पातळीवरचे प्रयत्न, विविध करार, विविध परिषद, विविध कायदे, मार्गदर्शक “तत्त्वे अशा विविध स्तरावर होणारे प्रयत्न. पर्यावरण रक्षण-स्वच्छता हा खरेतर निव्वळ काही मार्कांचा शैक्षणिक विषय नाही.
तर त्यातून आपल्याला अखंड जैव-विविधता टिकवण्यासाठी शाश्वत प्रयत्नांची कास धरावी लागणार आहे. नाही तर पुढच्या अनेक पिढ्या नैसर्गिक वातावरणापासून वंचित राहतील. शाश्वत पर्यावरणाचे महत्त्व पटण्यासाठी आणखी कदाचित आपल्याला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.?