मुंबई (प्रतिनिधी) : महागाईचा भडका उडाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. नागरिकांनी केलेली बचत वस्तूंच्या खरेदीमध्ये खर्च होऊ लागली आहे. त्यामुळे संकटकाळात थोडा तरी पैसा आपल्या हातात रहावा, या विचाराने सध्या ग्राहक आपल्या गरजा कमी करताना दिसत आहेत. परिणामस्वरूप दररोज लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाल्याचं समोर आलं आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. याबाबत ‘रिटेल इंटेलिजन्स बिजोम’ या संस्थेकडून एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या अहवालामधून वाढत्या महागाईमुळे लोकांनी खरेदी कमी केली असल्याचं समोर आलं आहे.
अहवालातून प्राप्त आकडेवारीनुसार दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मागणीमध्ये ५.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक रोजच्या वस्तूंचीदेखील खरेदी टाळू लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई ६.०७ टक्के होती. ती मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांवर पोहोचली. उत्तर, पूर्व आणि मध्य भारत वगळता जवळपास सर्वच राज्यांमध्ये या महागाईचा प्रभाव जाणवू लागला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीमध्ये घसरण झाली आहे. या अहवालानुसार दक्षिण भारतात परिस्थिती आणखी चिंताजनक असून तिथल्या ग्राहकांच्या खरेदीमध्ये १८.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
या अहवालानुसार किरकोळ महागाईत झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी कशा प्रभावित झाल्या आहेत, हे सांगण्यासाठी ‘रिटेल इंटेलिजन्स बिजोम’नुसार सर्वात मोठा फटका हा ओडिशाला बसला आहे. ओडिशामध्ये गृहोपयोगी वस्तूंच्या मागणीमध्ये तब्बल ३२.४ टक्यांची घट झाली आहे. ओडिशानंतर आंध्र प्रदेश २८.५ टक्के, तेलंगणा २५.५ टक्के, झारखंडमध्ये १९.१ टक्के, कर्नाटकमध्ये १८.५ टक्के, महाराष्ट्रात ९.३ टक्के आणि केरळ मध्ये ३.१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाईत आणखी भर पडली आहे.
गेल्या सतरा महिन्यात महागाईने उच्चांकी आकडा गाठला. किरकोळ महागाईत वाढ सुरूच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. गेल्या १७ महिन्यांमध्ये किरकोळ महागाईचा दर कधीच इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला नव्हता. मार्च महिन्यात किरकोळ महागाई ६.९५ टक्क्यांवर पोहोचली आहे. मार्च महिन्यात झालेली किरकोळ महागाईतली वाढ प्रचंड असल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किंमतींमुळे किरकोळ महागाईचा दर आवाक्यात येणं तर दूरच; पण आता हा दर चिंताजनक स्थितीवर जाऊन पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.०७ टक्के होता. आता हा दर ६.९५ झाला आहे. मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये किरकोळ महागाईचा दर ७.६८ टक्के इतका होता. दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीला किरकोळ महागाईचा दर ५.८५ टक्के होता. दरम्यान, मार्च महिन्यात पेट्रोलसोबतच भाज्यांचे दर आणि खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्याचं दिसून आल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे, खाद्यपदार्थांचे दर ७.६८ टक्क्यांनी वाढले आहेत. ग्रामीण भागातही खाद्य पदार्थांचे दर ८.०४ टक्के तर शहरी भागात खाद्य पदार्थांचे दर ७.०४ टक्क्यांनी वाढले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढला आहे. या वाढत्या महागाईने सगळ्यांचेच बजेट कोलमडले आहे.
Right